>> देवेंद्र भगत
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळू लागली असून आगामी हिवाळय़ात आर्द्रता वाढल्याने प्रदूषण आणखी वाढणार आहे. त्यामुळे पालिकेने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या 27 नियमांमध्ये सुधारणा करीत आणखी दोन नियमांची भर घातली आहे. यानुसार धुरामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणी कामगारांना चूल पेटवून जेवण बनवण्यास आणि लाकडांची शेकोटी पेटवण्यास बंदी घालण्यात आली आहे. कंत्राटदारांना बांधकामांच्या ठिकाणच्या कामगारांना आता तयार जेवण आणि इलेक्ट्रिक शेगडी द्यावी लागणार आहे.
मोठा समुद्रकिनारा लाभलेल्या मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांसापासून हिवाळ्यात वाढणाऱया आर्द्रतेमुळे बांधकामांची धूळ हवेत तासन्तास टिकून राहत असल्याने हवेची गुणवत्ता ढासळते. यातच हिवाळय़ात शेकोटीसाठी कचरा, टायर, लाकूड जाळून शेकोटी पेटवली जात असल्यामुळे धूर निर्माण होऊन प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे पालिकेने शेकोटी पेटवण्यास बंदी घातली आहे. या वर्षी तर बांधकामाच्या ठिकाणच्या कामगारांना, सुरक्षा रक्षकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी पंत्राटदारांना इलेक्ट्रिक शेगडी देण्याचे निर्देशही पालिकेने दिले आहेत. शिवाय मालकांनी आपले सुरक्षा रक्षक, बांधकाम कामगार यांना जेवण बनवण्यास न लावता स्वतः तयार डबे द्यावेत, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
प्रत्येक वॉर्डमध्ये एक स्प्रिंकलर
धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक वार्डमध्ये 5 ते 9 हजार लिटरचे स्प्रिंकलर देण्यात आले आहेत. हे प्रिंकलर फवाऱयाप्रमाणे रस्त्यांवर, वस्तींमध्ये पाणी फवारून हवेत उडणाऱया धुळीचे प्रमाण कमी केले जाणार आहे. यासाठी पिण्याचे पाणी नाही तर पुनर्वापर करून निर्माण झालेले पाणी वापरण्यात येणार आहे.
प्रदूषणकारी बांधकामांना नोटीस बजावणार
मुंबईत सुरू असलेल्या पाच हजारांवर बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणाऱया धुळीपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने बांधकामाच्या ठिकाणी 20 ते 30 फुटांपर्यंत कपडय़ाने झाकून काम करण्याचे निर्देश याआधीच दिले आहेत. शिवाय बांधकामाच्या ठिकाणी प्रिंकलर लावणेही बंधनकारक आहे.
ही कार्यवाही न केल्यास पालिकेकडून नोटीस बजावली जाणार आहे. यामध्ये संबंधितांनी विहित मुदतीत कार्यवाही केली नाही तर ‘काम बंद’ची कारवाई केली जाणार आहे. यासाठी गेल्या वर्षीच 27 प्रकारची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये या वर्षी आतापर्यंत दोन नियमांची भर घालण्यात आली आहे.