मुंबईत आवाज महाविकास आघाडीचाच…!

4 days ago 1

गद्दारीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळून महायुतीचे सरकार आल्यानंतर अडीच वर्षांनी उद्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गद्दारांविरोधात प्रचंड संताप मतदारांमधून व्यक्त होत असल्यामुळे भाजप-शिंदे गटाचे सरकार राज्यातून हद्दपार होऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह मित्रपक्षांचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट चित्र सध्या सर्वच मतदारसंघात दिसत आहे.

शिवसेनेचा माहीम बालेकिल्ला अभेद्यच

माहीम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपारिक अभेद्य बालेकिल्ला आहे. या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेश सावंत, शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि मनसेचे अमित ठाकरे हे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात शिंदे गट आणि मनसेमध्ये पाठिंब्यावरून मतभेद आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचा फायदा शिवसेनेचे महेश सावंत यांना होणार आहे. या मतदारसंघातील समस्या खास करून इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रलंबित प्रश्न हा आहे. यामुळे विद्यमान आमदारांवर मतदार कमालीचे नाराज आहेत. महेश सावंत यांच्याकडून जनतेचे प्रश्न सोडवण्याचे ठाम आश्वासन मिळत असल्याने त्यांचा विजय नक्की आहे.

विक्रोळीत विकासकामांचीच मशाल

विक्रोळीत गेल्या दहा वर्षांत शिवसेनेने प्रचंड विकासकामे केली आहेत. या वेळीही या विकासकामांचीच मशाल मतदारसंघात धगधगणार हे निश्चित आहे. शिवसेनेकडून विद्यमान आमदार सुनील राऊत येथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी केलेली विकासकामे प्रचंड तसेच जनसंपर्कही मोठा आहे. गेल्या दहा वर्षांत विकासकामांच्या जोरावर सुनील राऊत यांनी आपला दबदबा निर्माण केला. पुनर्विकास, रुग्णालय, सांडपाणी, रस्ते आणि वाहतुकीचा प्रश्न अशा अनेक समस्या मार्गी लावत सुनील राऊत यांनी या मतदारसंघातील जनतेच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे. त्यामुळे कर्तृत्वशून्य असलेल्या शिंदे गटाच्या सुवर्णा करंजे यांचे डिपॉझिटही वाचणार नाही अशी स्थिती आहे.

वांद्रे पूर्वमध्ये मतदारांचा कल शिवसेनेकडे 

पुनर्विकास, पाणीपुरवठा, हवेचे प्रदूषण, वाहतूककाsंडी असे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी वांद्रे पूर्व मतदारसंघात नव्या दमाचे शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्याकडे अपेक्षेने पाहिले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार झिशान सिद्दिकी यांना गेल्या पाच वर्षांत कोणतेही प्रलंबित प्रश्न सोडवण्यात यश मिळालेले नाही तसेच पुनर्विकासाचे प्रश्न प्रलंबितच राहिल्यामुळे मतदारांचा कल शिवसेनेकडे झुकला आहे. त्यात सिद्दिकी यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. तृप्ती सावंत या मनसेच्या दलबदलू उमेदवाराबाबत लोकांना फारशी आस्था नसल्यामुळे लोकांचा कल वरुण सरदेसाई यांच्याकडे झुकला आहे.

वरळीत शिवसेनेचाच भगवा फडकणार

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळी विधानसभा क्षेत्रात 2009 चा अपवाद वगळता 1990 पासून शिवसेनेचाच भगवा फडकला आहे. मतदारसंघात शिवसेनेमुळे आतापर्यंत झालेली विकासकामे आणि गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघातील आमदार शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विभागाचा सर्वांगीण विकास केल्यामुळे प्रचारादरम्यान मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तर या ठिकाणी मनसेचे संदीप देशपांडे आणि शिंदे गटाच्या मिलिंद देवरा यांचे आव्हानच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचे चित्र दिसत आहे.

कलिनात एकहाती विजय 

कलिना विधानसभा मतदारसंघात शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पोतनीस यांनी आमदार म्हणून गेल्या दहा वर्षांत विकासकामे करत मतदारांचे प्रश्न सोडवले आहेत. राज्य सरकार, महापालिकेकडे पाठपुरावा करत विमानतळ परिसरातील सुमारे अडीच हजार झोपडीधारकांची पात्रता निश्चित करण्यात त्यांनी यश मिळवले आहे. त्यात भाजपचे अमरजित सिंह हे मतदारसंघाबाहेरचे उमेदवार असल्यामुळे मतदारांमध्ये नाराजी असून सिंह यांचा प्रभाव कमीच आहे. शिवसेना-महाविकास आघाडीला विविध समाजघटकांनी पाठिंबा दिल्यामुळे कलिनातील लढतीत शिवसेनेला एकहाती विजय मिळणार असल्याची चर्चा आहे. मतदारसंघात केलेली विकासकामे आणि दांडगा जनसंपर्क ही पोतनीस यांची जमेची बाजू आहे.

दिंडोशीत सुनील प्रभू हॅट्ट्रिक करणार

दिंडोशी मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार सुनील प्रभू हे येथून आमदारकीची हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केलेल्या विकासकामांची पावती मतदार मतपेटीद्वारे निश्चितच देतील, असे चित्र आहे. महायुतीकडून शिंदे गटाचे संजय निरुपम रिंगणात आहेत.

शिवडीकर हॅटट्रिकसाठी सरसावले

शिवडी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अजय चौधरी यंदा तिसऱयांदा निवडणूक रिंगणात आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांची यावेळी हॅटट्रिक झालीच पाहिजे यासाठी शिवडीतील मतदार सरसावले आहेत. मराठी मते पह्डण्यासाठी उभ्या राहिलेल्या मनसेला निवडून देऊन 2009 सारखी चूक पुन्हा करायची नाही असा पणच शिवडीकरांनी केला आहे.

भायखळय़ात गद्दारांना धडकी

शिवसेनेशी गद्दारी करून मिंध्यांशी संधान साधलेल्या भायखळा मतदारसंघातील मिंधे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांना महाविकास आघाडीचा जोर पाहून धडकी भरली आहे. भायखळय़ातील सर्वाधिक आणि एकगठ्ठा मते असलेला मुस्लिम मतदारच पाठीशी उभा राहिल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार मनोज जामसुतकर यांच्यात सत्तर हत्तींचे बळ मिळाले आहे.

गोरेगावमध्ये भाजपचा गड कोसळणार

गोरेगाव मतदारसंघात शिवसेनेचे समीर देसाई आणि भाजपच्या विद्या ठाकूर यांच्यात रंगतदार लढत होणार आहे. भाजपने दहा वर्षांत विकासाचा फक्त दिखावा केल्याची नाराजी मतदारांमध्ये आहे. त्यामुळे गोरेगावकर शिवसेनेचे डॅशिंग उमेदवार समीर देसाई यांना भरघोस मतदान करतील आणि भाजपचा गड कोसळेल, अशी चिन्हे आहेत.

मुंबादेवीत महाविकास आघाडीचे पारडे जड

 मुस्लिमबहुल असलेल्या मुंबादेवी मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अमीन पटेल चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात  आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 पासून हा मतदारसंघ काँग्रेसकडे  आहे. त्यांची मुख्य लढत शायना एन. सी. यांच्याशी आहे. अमीन पटेल यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्याबाबत प्रो-इन्कम्बसी दिसून येतेय. विकासकामांच्या जोरावर अमीन पटेल यांनी मतदारांची मनं जिंकली आहेत.

धारावीत पुनर्वसनाचा लढा महत्त्वाचा

यंदाच्या निवडणुकीत धारावीचा पुनर्विकास निर्णायक ठरणार आहे.   महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या डॉ. ज्योती गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत. ज्योती गायकवाड धारावी बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या आहेत. प्रकल्पाच्या नावाखाली अदानीच्या घशात जमिनी घातल्या जात असल्याने स्थानिकांनी तसेच महाविकास आघाडीने जोरदार विरोध केला आहे. या मुद्दय़ावर धारावीकरांची साथ महाविकास आघाडीच्या बाजूने आहे.

बोरिवलीत परिवर्तनाची हवा

बोरिवली विधानसभा मतदारसंघात मतदारांनी भाजपला वारंवार संधी देऊनही वाहतूक, पाणी, रस्ते  आणि मूलभूत सुविधांची वानवा असल्यामुळे आता मतदार परिवर्तनाच्या मानसिकतेत असून महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे संजय भोसले यांना प्रचारादरम्यान प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बोरिवलीत परिवर्तनाचीच हवा आहे. भाजपमध्ये मतदारसंघाबाहेरील संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.

दहिसरमध्ये परिवर्तन अटळ

दहिसरमध्ये गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा आमदार असताना विकासकामे रखडल्याने मतदार राजा नाराज आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीसाठी विकास, महिला सुरक्षा, दर्जेदार मूलभूत सुविधांच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवणारे शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांना प्रचारादरम्यान प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मतदार घोसाळकर यांना साथ देतील असेच चित्र दिसत आहे.

मागाठाणेचा गड शिवसेना राखणार

गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या मागाठाणे विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत शिवसेनेचाच आमदार राहिल्याने विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे महायुतीचे आव्हान नसल्यामुळे मतदार शिवसेनेच्याच पाठीशी राहणार असल्याचे दिसत असून महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उदेश पाटेकर यांना ही निवडणूक सोपी जाणार असल्याचे स्पष्ट आहे.

अंधेरीत शिवसेनेचाच वरचष्मा

अंधेरी पूर्व मतदारसंघात मागील एक दशकापासून शिवसेनेचेच वर्चस्व आहे. आमदार रमेश लटके यांनी त्यांच्या कार्यकालात अनेक विकासकामे केली होती. त्यामुळे अंधेरी-पूर्व मतदारसंघ व शिवसेनेचे नाते उत्तरोत्तर दृढ झाले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेना आमदार ऋतुजा लटके महाविकास आघाडीतर्फे रिंगणात उतरल्या आहेत, तर शिंदे गटातर्फे मुरजी पटेल निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या पारडय़ात भरघोस मतांचे दान पडेल, असे चित्र आहे.

कुलाब्यात भूमिपुत्रांच्या समस्या निर्णायक

मागील गेली दोन टर्म हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असूनही तेथील भूमिपुत्रांच्या समस्या जैसे थे आहेत. कुलाबा मतदारसंघात मुख्य लढत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार हिरा देवासी आणि भाजपाचे विद्यमान आमदार राहुल नार्वेकर यांच्यात आहे.  मतदारसंघात कोळीवाडय़ाचे प्रश्न, झोपडपट्टी पुनर्विकास, जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती, पार्पिंगची समस्या आणि अपुरा पाणीपुरवठा अशा समस्यांना कायम आहेत. या समस्या निवडणुकीत निर्णायक ठरून बदल घडेल, असे चित्र आहे.

मलबार हिलमध्ये बदलाचे वारे

 गेली अनेक टर्म भाजपचे मंगलप्रभात लोढा या मतदारसंघातून निवडून येऊनही तेथील प्रश्न जैसे थे आहेत. पाणी, पुनर्विकास, पाकि&ंग यांसारख्या समस्यांवरून त्यांच्याविरोधात रोष आहे.  अशातच महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे भैरू चौधरी जैन यांच्यासारखा दांडगा जनसंपर्क असलेला, सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला आणि जनमानसात चांगली प्रतिमा असलेला उमेदवार निवडणूक ंिरंगणात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काटें की टक्कर होऊन बदल होईल असे चित्र आहे.

चेंबूरमध्ये प्रकाश फातर्पेकरांना हॅट्ट्रिकची संधी

चेंबूर मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रकाश फातर्पेकर यांना हॅटट्रिकची संधी आहे. त्यांनी 2014 व 2019 मधील विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवला. दोन्ही टर्मला त्यांनी जोरदार विकासकामांचा धडाका लावला. यावेळेच्या निवडणुकीत हॅट्ट्रिक करतानाच त्यांना विक्रमी मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे तुकाराम काते हेप्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. मतदारसंघातील विकासकामांमुळे महाविकास आघाडी आणि शिवसेनेचेच पारडे जड आहे.

वांद्रे पश्चिममध्ये महाविकास आघाडीला बळ   

वांद्रे पश्चिममधील सुजाण मतदारांना सर्वसमावेशक विकास हवा आहे. भाजपचे उमेदवार आशीष शेलार दोन वेळा निवडून आले आहेत. मात्र यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून एकत्रितपणे निवडणूक लढत आहे तसेच मनसेचा उमेदवार नसल्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार आसीफ झकारीया यांना मिळण्याची शक्यता आहे.

जोगेश्वरीत ‘निष्ठावान’ अनंत नर सरस

जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाने अनेक वर्षे शिवसेनेलाच साथ दिली आहे. येथून ‘निष्ठावान शिवसैनिक’ म्हणून अनंत (बाळा) नर यांना विधानसभेत पाठवतील, असे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून शिवसेनेला मताधिक्य मिळाले होते. नर यांनी नगरसेवकपदाच्या कारकीर्दीत प्रत्येक विभागातील नागरी कामांना प्राधान्य दिले. येथे शिंदे गटातर्फे मनीषा वायकर, तर मनसेतर्फे भालचंद्र अंबुरे निवडणूक लढवत आहेत.

भांडुपमध्ये निष्ठावंतांचाच आवाज

मुंबईचे मिनी कोकण असलेल्या भांडुपमध्ये गद्दार विरुद्ध निष्ठावंत असाच सामना रंगणार असून निष्ठावंतांचेच पारडे जड असल्याचे चित्र आहे. शिवसेना उमेदवार रमेश कोरगावकर यांनी भांडुप या मतदारसंघात दुपटीने कामे केली आहेत. शिंदे गटाचे अशोक पाटील यांच्या नावावर गद्दार शिक्का बसला असून या मराठमोळय़ा मतदारसंघात विकासकामांनामुळेच कोरगावकर यांना जनमत मिळेल असेच चित्र मतदारसंघात आहे.

वडाळय़ात शिवसेना बाजी मारणार

झोपडपट्टीवासीयांपासून मध्यमवर्गीय-उच्च मध्यमवर्गीय असा संमिश्र लोकवस्तीच्या वडाळा  मतदारसंघात जुन्या चाळींच्या प्रश्नांपासून बीडीडी चाळी, पोलीस वसाहत, सहकार नगर झोपडपट्टय़ा, पाणी आणि पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मतदारसंघात शिवसेनेच्या श्रद्धा जाधव, भाजपचे कालिदास कोळंबकर यांच्यात लढत असून प्रलंबित प्रश्नांमुळे शिवसेनाच बाजी मारेल असे चित्र आहे.

घाटकोपर पूर्वेतील जनादेश आघाडीला 

घाटकोपर पूर्व हा मतदारसंघ गेली तीन टर्म भाजपकडे होता. अर्थात शिवसेनेच्या ताकदीच्या जोरावर हे साध्य झाले होते. पण यंदा चित्र वेगळे आहे. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार राखी जाधव त्यांना काँटे की टक्कर देणार आहेत. पराग शहा यांना यंदा नारळ देऊन राखी जाधव यांना विजयी करण्याचा निर्धार यंदा मतदारसंघातील जनतेने केला आहे.

घाटकोपर पश्चिममध्ये शिवसेनेचा बोलबाला  

घाटकोपर पश्चिम मतदारसंघात गेली 15 वर्षे विद्यमान आमदार राम कदम यांनी केवळ वेगवेगळे इव्हेंट करून नागरिकांना खूश करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जुमलेबाजीमुळे घाटकोपर पश्चिम मतदारसंघात मूलभूत सुविधा, झोपडपट्टी, जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न, वाहतूककाsंडी आदी समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. तर शिवसेनेचे संजय भालेराव यांनी नगरसेवक असताना केलेली कामे सर्वांसमोर आहेत. त्यामुळे यंदा राम कदम यांना डच्चू देऊन घाटकोपरवासीय संजय भालेराव यांना संधी देण्याच्या तयारीत आहेत.

शीव कोळीवाडय़ात बदल घडणार

मुंबईतल्या सर्वाधिक मतदार असलेल्या शीव कोळीवाडा मतदारसंघाचे स्वरूप दिवसेंदिवस बकाल होत चालले आहे. सर्वच भागांत पायाभूत सुविधांची वानवा आहे. समस्यांच्या विळख्यात अडकलेले मतदार या भागाचा विकास कधी होणार याच्या प्रतीक्षेत आहेत. शीव कोळीवाडा मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे गणेश कुमार यादव, भाजपचे विद्यमान आमदार तामिल सेल्वन यांच्यात लढत होत आहे. सेल्वन यांच्याबाबत मतदारांत असलेल्या नाराजीमुळे गणेश यादव यांना संधी मिळण्याचा अंदाज आहे.

विलेपार्ल्यात बदल घडणार

विर्लेपार्ले मतदारसंघ मुंबईतील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. शिवसेनेकडून माजी नगरसेवक संदीप राजू नाईक हे निवडणूक मैदानात आहेत.  सलग दोनदा विजयी झालेल्या पराग अळवणी यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. परंतु, पराग अळवणी यांची विजयाची हॅटट्रिक हुकून बदल घडणार असे चित्र मतदारसंघात दिसत आहे.  विमानतळ फनेल झोन, रखडलेल्या झोपु योजना, इमारतींचा रखडलेला पुनर्विकास हेच मुद्दे पेंद्रस्थानी आहेत. या मुद्दय़ांसह सध्या विलेपार्ले मतदारसंघात वाहतूककाsंडीचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

मानखुर्दमध्ये जोरदार चुरस   

पूर्व उपनगरातील मानखुर्द-शिवाजीनगर हा मुस्लिमबहुल परिसर असलेला हा मतदार संघ जिंकण्यासाठी यावेळी जोरदार लढाई बघायला मिळणार आहे. गेले तीन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे समाजवादी पक्षाचे अबू आसिम आझमी हे चौथ्यांदा विजयी होण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नवाब मलिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीला मिळत असलेला जोरदार पाठिंबा बघता नवाब मलिक यांचा पराभव अटळ असल्याची चर्चा आहे.

अणुशक्तीनगरमध्ये आघाडीचीच हवा

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात  नवाब मलिक यांची कन्या सना मलिक या अजित पवार गटाकडून तर फहाद अहमद हे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने महविकास आघाडीला मजबूत पाठिंबा दिला होता. यावेळी देखील महाविकास आघाडीचे उमेदवार फहाद अहमद यांना जनतेची पसंती मिळत आहे.

अंधेरी पश्चिमेत आघाडीचा दबदबा

अंधेरी पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार काँग्रेसचे अशोक जाधव व महायुतीचे उमेदवार अमित साटम यांच्यात थेट लढत आहे. मात्र या मतदारसंघातील शिवसेनेची मोठी ताकद व अल्पसंख्याक मतदारांचा महाविकास आघाडीला असलेला पाठिंबा यामुळे अशोक जाधव यांच्या गळ्यात विजयाची माळ पडेल, असे चित्र येथे आहे.

वर्सेव्यात ‘मशाल’च धगधगणार

वर्सेव्यात महाविकास आघाडीचे उमेदवार कट्टर शिवसैनिक हारून खान मैदानात आहेत. या मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आणि अल्पसंख्याक मतदारांची संख्या यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार भारती लव्हेकर यांच्याबद्दल येथील मतदारांत प्रचंड नाराजी असल्याने त्यांना चांगलीच धूळ चारून येथे मशाल धगधगेल, अशी स्थिती आहे.

चांदिवलीत महाविकास आघाडी भक्कम

चांदिवलीतून काँग्रेसचे उमेदवार मो. आरिफ (नसीम) खान हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर शिंदे गटाकडून दिलीप लांडे हे मैदानात आहेत. परंतु, या मतदारसंघात नसीम खान यांचे पारडे जड आहे. नसीम खान यांच्या मागे काँग्रेस, शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष मोठय़ा ताकदीने उभा आहे. मागील वेळी झालेला निसटत्या पराभवाचा वचपा काढन्याची जोरदार तयारी नसीम खान यांनी केली आहे.

कुर्ला मतदारसंघात निष्ठावंतांचं तुफान

कुर्ला मतदारसंघ हा निष्ठावान शिवसैनिकांचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेने प्रविणा मोरजकर यांना  निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. तर शिंदे गटाचे विद्यमान आमदार मंगेश कुडाळकर यांना उमेदवारी दिली आहे. कुर्ला मतदारसंघात विकासाची कामे पुरेसी झाली नाहीत, असे मतदारांना वाटतेय त्यामुळे ही निवडणूक ही मंगेश कुडाळकर यांच्यासाठी अजिबात सोपी राहिलेली नाही.

मुलुंडमध्ये महाविकास आघाडीचा हात

मुलुंडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार मिहिर कोटेचा आणि काँग्रेसचे राकेश शेट्टी यांच्यात थेट लढत होत आहे. या मतदारसंघात मागील 28 वर्षांपासून भाजपचा आमदार असतानाही रस्त्यांची दुरवस्था, वाहतूककाsंडी, पाण्याचा प्रश्न आहे. याशिवाय डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे या वेळी मुलुंडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला संधी असून मुलुंडच्या विकासाला महाविकास आघाडीच हात देईल असा विश्वास व्यक्त होत आहे.

मालाडमध्ये अस्लम शेख विजयी चौकार मारणार 

मालाड पश्चिममध्ये सलग तीन वेळा निवडून आलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार अस्लम शेख यांचा सामना भाजप उमेदवार विनोद शेलार यांच्यासोबत होणार आहे. स्थानिक कार्यकर्त्याला डावलून विनोद शेलार यांच्या रूपाने बाहेरचा उमेदवार लादल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. त्यातच अपात्र धारावीकरांचे अक्सा आणि मालवणीत पुनर्वसन करण्याचा निर्णय मिंधे-भाजप सरकारने घेतल्याने मढ, भाटी, एरंगळ, अक्सा, मार्वे, मालवणी येथील भूमिपुत्रांची महायुती सरकारविरोधात नाराजी आहे.

कांदिवलीत भाजपला तगडे आव्हान  

कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा अतुल भातखळकर यांना संधी दिली. त्यांच्यासमोर काँग्रेसचे कालु बुधेलिया व मनसेकडून महेश फरकासे निवडणूक लढवत आहेत. गेली दहा वर्षे येथे भाजपचे वर्चस्व असूनही वाहतूककाsंडी, रखडलेला पुनर्विकास, अपुरा पाणीपुरवठा असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कालु बुधेलिया यांना गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीयांचा मोठा पाठिंबा मिळतोय. शिवसेनेमुळे मराठी मतदारांची मतेदेखील त्यांच्या पारडय़ात पडतील असे चित्र आहे.

चारकोपमध्ये आघाडीचाच बोलबाला 

चारकोप विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार योगेश सागर यांना काँटे की टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार यशवंत सिंह निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तीन टर्म भाजपचे आमदार असूनही या मतदारसंघातील एकता नगर, गणेश नगर येथील अनेक एसआरए प्रकल्प रखडले आहेत. नाले आणि गटारांच्या अर्धवट कामांमुळे पावसाळय़ात नागरिकांच्या घरात तसेच रस्त्यावर पाणी साचते अशा समस्या आहेत. त्यामुळे येथे भाजपचे पानिपत होणार हे नक्की.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article