लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत गोंधळ कमी होता. काही ठिकाणच्या मतदान केंद्रातील अपवाद वगळता मुंबईत बहुतांश ठिकाणी रांगा कमी दिसत होत्या. कर्मचाऱयांना जेवण, पाण्यापासून मतदारांनाही सुविधा चांगल्या मिळाल्याचे दिसून आले. असुविधांच्या तक्रारी कमी आल्या. त्यामुळे गेल्या दीड-दोन महिन्यांपासून मतदान प्रक्रियेच्या दडपणामुळे सतत तणावाखाली असलेल्या निवडणूक विभागाच्या अधिकाऱयांवरील ताण संध्याकाळपर्यंत निघून गेला होता.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेस प्रचंड तक्रारी आल्या होत्या. अनेक मतदार केंद्रांच्या बाहेर प्रचंड रांगा लागल्या होत्या. निवडणूक कर्मचाऱयांपासून मतदारांना दिल्या जाणाऱया सुविधांचा अभाव दिसून आला होता. पिण्यासाठी पाण्याची सुविधाही नव्हती. रांगांमुळे मतदानावर परिणाम झाला होता. त्यावर विविध राजकीय पक्षांनी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने नाराजी दर्शवली होती.
विधानसभा निवडणुकीतही असुविधांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र देऊन सुविधा वाढवण्याची मागणी केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानात असुविधा कमी दिसून आल्या. पोलिसांपासून निवडणूक कर्मचाऱयांना जेवण, पाणी आणि इतर सुविधा वेळेवर मिळाल्या. मुख्य म्हणजे रांगा लवकर पुढे सरकत असल्यामुळे मतदारही अधिक संख्येने मतदानासाठी उतरले होते. मतदार यादीतून नाव गायब झाल्याच्या तक्रारीही कमी आल्या, असे निवडणूक अधिकाऱयांनी सांगितले.
रांगा कमी होण्याचे कारण
लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रात एकावेळी एकाच मतदाराला प्रवेश दिला जात होता त्यामुळे प्रचंड रांगा लागल्या होत्या. पण यंदा एकावेळेस चार जणांना एकावेळेस मतदान केंद्रात प्रवेश देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे रांगा कमी लागल्या. पश्चिम उपनगरातील मतदान केंद्रांत मतदानासाठी टोकन सिस्टम करण्यात आली होती.
मतदान पेंद्राची संख्या वाढली
लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या सुमारे 98 हजार होती. या निवडणुकीसाठी एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे करण्यात आली.
धूळ रोखण्यासाठी पाण्याची फवारणी
मुंबईची हवा बिघडली असून प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले आहे. हवेत धूलिकण वाढल्याच्या पार्श्वभूमीवरही निवडणूक आयोगाने मतदारांची पुरेशी काळजी घेतल्याचे चित्र दिसले. मतदान पेंद्रांच्या परिसरात धूळ रोखण्यासाठी पाण्याची फवारणी करण्यात आली.
उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मतदान केंद्रांच्या आवारात छत, पिण्याचे पाणी, आसनव्यवस्था, व्हिलचेअर्स अशा सोयीसुविधा उपलब्ध केल्या होत्या. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या मदतीसाठी एनएसएसचे स्वयंसेवक कार्यरत होते. तसेच मतदान पेंद्रात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मतदान कक्षाच्या गेटवर सीसीटीव्ही पॅमेरे लावले होते. तसेच रांगेची शिस्त पाळली जात होती. काही ठिकाणी मतदान प्रक्रियेला उशीर होत होता. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास रांगा लांबलचक झाल्या होत्या.
मुंबईत मतदान पेंद्रे वाढवण्याचा आयोगाचा निर्णय योग्य ठरला. पेंद्रांवरील सुविधा देण्यात महापालिकेने चांगली भूमिका बजावली. उपनगर आणि शहर विभागातील जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियोजन फायद्याचे झाले.
डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी