वाढलेले मतदान कुणाच्या पारड्यात? निकालाची उतस्तुकताPudhari News Netwrok
Published on
:
21 Nov 2024, 6:15 am
राज्यातील दुसर्या क्रमांकाचा सर्वांत मोठा असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार स्वयंस्फूर्तीने मतदानासाठी बाहेर पडले. मतदानाचा उत्साह सायंकाळपर्यंत कायम असल्याने मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदारांनी कमळ व तुतारी चिन्हास मोठी पसंती दिल्याचे दिसून आले. मागील चार निवडणुकीच्या तुलनेत यंदा वाढलेली मते कोण्याचा पारड्यात पडणार हे येत्या शनिवारी (दि.23) स्पष्ट होणार आहे.
मामुर्डी-किवळेपासून सुरू होणारा या मतदारसंघाचे शहराचे दुसरे टोक असलेल्या सांगवीपर्यंतच्या भागात समावेश आहे. मतदारसंघात मध्यमवर्गीय, उच्चभ्रू, उच्चशिक्षित तसेच आयटी अभियंता अशा शहरी मतदारांचा सर्वांधिक भरणा आहे. शहरातील सर्वांधिक एकूण 6 लाख 63 हजार 622 मतदार येथे आहेत. त्यात पुरुष 3 लाख 48 हजार 450, महिला 3 लाख 15 हजार 115 आणि तृतीयपंथी मतदार 57 इतके आहेत.
मतदान केंद्रांबाहेर सेल्फी घेण्याचा अनेकांनी आनंद घेतला. पुरुषांसोबत महिला, युवा व ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी सहभागी होत असल्याचे चित्र सर्वच मतदान केंद्रांवर दिसून आले. सकाळी 7 ते 9 या पहिल्या दोन तासांत 6.80 टक्के मतदान झाले. सकाळी 9 ते 11 या वेळेत 10.17 टक्के मतदान झाले. चार तासांत 16.97 टक्क्यांवर मतदान पोहोचले. त्यानंतर
मतदारांचा ओघ कायम होता. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत 12.37 टक्के मतदान झाले. दुपारी 1 ते 3 या वेळेत 9.58 टक्के मतदान पार झाले. दुपारी तीनपर्यंत 40.43 टक्क्यांवर मतदान पोहोचले. दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत निम्म्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
एकूण 50.01 टक्के मतदान झाले. तर, सायंकाळी मतदानप्रक्रिया संपेपर्यंत सरासरी एकूण 56 टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा टक्का वाढल्याने कोणाची मते वाढणार, कोणाची मते घटणार, याकडे लक्ष लागले आहे. येत्या शनिवारी (दि.23) होणार्या मतमोजणीत मतदारांनी कोणाला कौला दिला हे स्पष्ट होणार आहे.
प्रचाराचा धुरळा
निवडणूक रिंगणात भाजपचे शंकर जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल कलाटे यांच्यात सामना रंगला. तर, अपक्ष भाऊसाहेब भोईर यांनीही आव्हान निर्माण केले. एकूण 21 उमेदवार लढतीत होते. त्या सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार करीत मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.
जगताप यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मंत्र्यांच्या सभा झाल्या. तर, कलाटेंच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, शिवसेनेचे नेते संजय राऊत, आ. रोहित पवार आदी नेत्यांच्या सभा व मेळावे झाले. त्यामुळे प्रचारात रंगत निर्माण झाली होती.