Winter Skin Care Tips : हिवाळ्याच्या हंगामात त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते, कारण यावेळी थंड वारे आणि कमी आर्द्रतेमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. थंड हवामानामुळे हवेतील आर्द्रता कमी होते, त्यामुळे त्वचा कोरडी दिसू लागते. याशिवाय हिवाळ्यात तापमानात देखील घट होत असल्याने आपल्या त्वचेतील ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक असते. त्वचेला ओलावा मिळावा आणि चमक कायम राहावी यासाठी अनेक जण ब्युटी प्रॉडक्ट्ससोबतच घरगुती उपायांचा वापर करतात.
घरगुती उपचारांमध्ये लोकं अनेक नैसर्गिक गोष्टींचा वापर करून थेट चेहऱ्यावर लावतात, परंतु यामुळे त्वचेचे नुकसान देखील होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही नैसर्गिक गोष्टींबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही हिवाळ्यात चेहऱ्यावर लावणे टाळावे.
लिंबाचा रस : बरेच लोकं त्वचेची काळजी घेण्यासाठी लिंबाचा रस वापरतात. हिवाळ्यात स्किन केअरसाठी हे टाळले पाहिजे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते आणि ते त्वचा उजळण्यासाठी ओळखले जाते. परंतु लिंबामध्ये लिंबूवर्गीय आम्ल असते, जे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी करू शकते आणि हिवाळ्यात कोरड्या त्वचेला अधिक हानी पोहोचवू शकते. त्यामुळे त्वचा अधिक कोरडी दिसू लागते. त्याचबरोबर लिंबू लावल्याने त्वचेवर खाज सुटणे आणि जळजळ होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
चंदन पावडर : आपण घरगुती उपाय करताना चेहऱ्यांसंबंधित अनेक प्रॉडक्ट वापरत असतो आणि त्यात चंदन पावडर अधिक प्रमाणात वापरतात. कारण चंदन पावडरचा वापर सामान्यत: त्वचा थंड करण्यासाठी आणि चेहरा चमकदार करण्यासाठी केला जातो, परंतु हिवाळ्यात यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. चंदनात त्वचा थंड करण्याचे गुणधर्म असतात, त्यामुळे हिवाळ्यात ते चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा ओलावा शोषून घेतला जाऊ शकतो, ज्यामुळे कोरडेपणा आणि जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
बेकिंग सोडा : बरेचजण घरगुती उपाय करताना त्वचेला फेसपॅक बनवताना बेकिंग सोडा वापरतात. पण हिवाळ्यात हे टाळले पाहिजे. कारण बेकिंग सोड्याची पीएच पातळी त्वचेच्या पीएच पातळीपेक्षा जास्त असते. अशावेळी याचा वापर केल्याने त्वचेची पीएच लेव्हल बिघडू शकते, ज्यामुळे त्वचेत कोरडेपणा, जळजळ किंवा लालसरपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.