मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. File Photo
Published on
:
27 Nov 2024, 8:47 am
Updated on
:
27 Nov 2024, 8:47 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही अद्याप मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री कोण होणार ? या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल. यावर तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील, आमच्या श्रेष्ठींशी सर्वांशी चर्चा सुरू आहे लवकरच आपल्याला उत्तर मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले. ते आज (दि. २७) पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आधी मुख्यमंत्री ठरेल, मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील. आदी मुख्यमंत्र्यांची वाट पहावी, नंतर मंत्र्यांची वाट पहावी.
दरम्यान विरोधकांनी EVM विरोधात जनआंदोलन छेडण्याचे सुतोवाच केले आहे. यावर फडणवीस म्हणाले की, EVM बाबतचे उत्तर काल सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, तुम्ही हारले म्हणजे ईव्हीएम वाईट ही पद्धत आता बंद करा. ईव्हीएम टेम्परप्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे. हा रडीचा डाव आता बंद करायला हवा. आगामी महापालिका निवडणूक ठाकरे शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावर ते म्हणाले की, मला याची कल्पना नाही. आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार का ? यावर ते आम्ही मिळून ठरवू, असे ते म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. अवघ्या ४६ जागा मिळाल्या. शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक २० जागा मिळाल्या. या निकालावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून शिवसेना आमदारांतून नाराजीचा सूर निघू लागला आहे. मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदारांनी याबाबत तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.