केंद्र सरकारने गाजावाजा करत वंदे भारत ट्रेन सुरू केली. सुरुवातीच्या काळात काही दुर्घटनांमुळे या ट्रेनची चर्चा होती. आता प्रवाशांनीही या ट्रेनकडे पाठ फिरवल्याची पुन्हा ही ट्रेन चर्चेत आली आहे. ही ट्रेन वेगवान आणि सुखकर प्रवासासाठी ओळखली जाते. मात्र, याचे प्रवासाचे दर आणि वेळा यासारख्या कारणांमुळे काही मार्गांवर या ट्रेनला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे 20 कोचची ही ट्रेन 8 कोचची करण्याचा विचार सुरू आहे.
देशात अनेक ठिकाणी वंदे भारत ट्रेन सुरु करण्याची मागणी होत आहे. मात्र, काही मार्गांवर ट्रेनला प्रवासी मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यात महाराष्ट्रातून धावणाऱ्या ट्रेनचा समावेश आहे. यामुळे 20 कोचची ट्रेन 8 कोचमध्ये बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत. नागपूरवरुन सिकंदराबाद जाणारी ही ट्रेन आहे. या ट्रेनला 25% पेक्षाही कमी ऑक्यूपेंसी आहे. त्यामुळे या ट्रेनचे कोच कमी करण्याबाबत विचार सुरू आहे.
नागपूरवरुन सिकंदराबाद ट्रेनला 20 कोच आहेत. परंतु प्रवासी मिळत नसल्याने तिला 8 कोचची करण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. वंदे भारत ट्रेनची नवीन खेप आल्यावर तिला बदलण्यात येणार आहे. ही ट्रेन 8 कोचची करण्यात येणार आहे. दिवाळीच्या सुट्टीच्या आठ दिवसांचा कालावधी वगळला तर ही ट्रेन पूर्ण ऑक्यूपेंसीने सुरु झाली नाही. यामुळे ही ट्रेन दोन भागांत करण्याचा प्रस्ताव मुंबई मुख्यालयात पाठवण्यात आल्याची माहिती नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. वंदे भारत ट्रेनची नागपूरवरुन सुटण्याची वेळ सकाळी पाच ऐवजी सात वाजता करण्यात येणार आहे. तसेच ट्रनचे रेकही बदलण्यात येणार आहेत.
वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या संख्येनुसार 8, 16 किंवा 20 कोचमध्ये करण्यात येणार आहे. नागपूर-सिकंदराबाद ट्रेनमध्ये प्रवासी मिळत नसल्यामुळे तिला 8 कोचचा चांगला पर्याय आहे. 16 कोच असणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये दोन एग्जीक्यूटिव्ह क्लास कोच आणि 14 चेअर कार कोच आहे. ज्या मार्गावर जास्त प्रवासी आहे, त्या मार्गावर 20 रेक असणारी ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. उर्वरित मार्गावर प्रवाशांच्या संख्येनुसार ट्रेनचे कोच असतील, अशी योजना आखण्यात येत आहे.