विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान
हिंगोली (Code of Conduct) : विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये उमेदवारासह त्यांच्या समर्थकांनी केलेल्या प्रचारामुळे चांगलाच धुराळा उडाला होता. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन न केल्याने जिल्हाभरात निवडणूक कालावधीत तब्बल २० दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यामध्ये दोन विद्यमान आमदारांचाही समावेश आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची घोषणा झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आदर्श (Code of Conduct) आचार संहिता लागू केली होती.
या आचार संहिता (Code of Conduct) कालावधीमध्ये काय करावे व काय करू नये याबाबतचे निर्देश निवडणूक विभागाच्या अधिकार्यासह निवडणूक रिंगणातील उमेदवारांना देण्यात आल्या होत्या. अनेक अधिकृत पक्षाच्या उमेदवारासह अपक्षानी देखील निवडणूक रिंगणात दंड थोपटले होते. या निवडणुकीमुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढला होता. प्रचाराकरीता उमेदवाराच्या नेत्यांच्याही जाहीर सभा झाल्या. त्याचप्रमाणे अनेक उमेदवारांनी रॅली काढून मोठे शक्ती प्रदर्शन केले होते. एकूणत: निवडणूक कालावधीमध्ये कुठेही आदर्श आचार संहितेचे (Code of Conduct) उल्लंघन होऊ नये, या दृष्टीने पथकही नियुक्त केले होते.
प्रचारा दरम्यान काही ठिकाणी उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने पथकाने पोलिसात रितसर तक्रारी दिल्या. त्यात जिल्हाभरात १४ दखलपात्र व ६ अदखलपात्र गुन्हे नोंदविण्यात आले. दखलपात्र गुन्हे पोलीस ठाणे निहाय कळमनुरी ६, सेनगाव, आखाडा बाळापूर प्रत्येकी २ आणि वसमत ग्रामीण, वसमत शहर, गोरेगाव, हिंगोली ग्रामीण प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे तर दखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलीस ठाणे निहाय हिंगोली शहर, कळमनुरी प्रत्येकी २ तर हिंगोली ग्रामीण व सेनगाव ठाणे प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. ऑक्टोंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. निवडणूक कालावधीमध्ये अनेक ठिकाणी आचार संहितेचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुन्ह्यात लोकप्रतिनिधींचाही समावेश
आदर्श आचार संहितेचे (Code of Conduct) उल्लंघन केल्या प्रकरणी दाखल झालेल्या दखलपात्र व अदखलपात्र गुन्ह्यामध्ये महायुतीमधील भाजपचे आमदार तान्हाजीराव मुटकुळे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार संतोष बांगर यांचाही समावेश आहे.