पुणे शहराजवळील सिंहगड रस्त्यावरील खडकवासला परिसरात कोल्हेवाडीत बुधवारी भर दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून, पोलिसांची पथके त्यांच्या शोधार्थ रवाना झाली आहेत.सतिश सुदाम थोपटे ( वय 38, रा. सुशीलापार्क,कोल्हेवाडी ,खाडकवासला , मुळ राहणार खानापूर थोपटेवाडी ता. हवेली) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली,आई वडील असा परिवार आहे. याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतिश थोपटे याचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. त्याच्या विरोधात यापूर्वी हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबारा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सतिश हा सुशिलापार्क जवळील कोल्हेवाडी रस्त्यावर उभा असताना कोयताधारी चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याच्यावर वार केले. त्यात सतीश गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात तो निपचित पडला. त्याला स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
कर्ज भरण्यासाठी फोन केल्यामुळे खूनाची शक्यता
सतिश थोपटे याच्या नावावर आरोपी पैकी एकाने फ्लॅट घेण्यासाठी 25 लाख रुपयांचे कर्ज काढले होते. तो कर्जाचे हप्ते भरत नसल्याने सतिश त्या व्यक्तीला वांरवार फोन करत होता.त्यातून चिडून जाऊन सतिशच्या नावावर कर्ज काढणाऱ्या आरोपीने साथीदारांच्या मदतीने त्याच्यावर कोयत्याने वार केले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी हवेली पोलिस पथकाने परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे कोल्हेवाडी खडकवासला किरकटवाडीसह परिसरात खळबळ उडाली. लोकवस्तीच्या ठिकाणी कोयत्याने हल्ला झाल्याने नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे.