Published on
:
27 Nov 2024, 4:11 pm
Updated on
:
27 Nov 2024, 4:11 pm
नागपूर : राज्यात महायुतीचे सरकार येणार हे 23 नोव्हेंबर रोजीच निश्चित झाले असले तरी नेमके मुख्यमंत्री कोण होणार? याविषयीचा सस्पेन्स अध्यापही कायम आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सरकार लवकरच स्थापन होणार, उद्यापर्यंत वाट पहा असे संकेत दिले. फडणवीस बुधवारी नागपुरात एका लग्नसमारंभासाठी आले आणि काही काळ थांबून पुन्हा संभाजीनगरला एका लग्न सोहळ्यासाठी बावनकुळे यांच्या समवेत रवाना झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
हायकमांडने मध्यप्रदेशप्रमाणे धक्कातंत्र न वापरल्यास मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड जवळपास निश्चित झाल्याचे संघ आणि भाजप वर्तुळात मानले जात आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्र परिषदेनंतर फडणवीस यांचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व एकनाथ शिंदे या दोघांनीही हाय कमांडचा निर्णय उद्याच्या तीनही पक्षांच्या बैठकीत होईल. श्रेष्ठींचा जो निर्णय असेल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील असे स्पष्ट केल्याने याविषयीची उत्सुकता उद्यापर्यंत कायम राहणार आहे.
रात्री उशिरा ते पुन्हा परतणार आहेत. उद्या सर्व नेते मंडळी दिल्लीला जाणार आहेत. दरम्यान, फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागपुरातील विमानतळावर तसेच त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दुपारी शिंदे यांच्या पत्र परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात आगमन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत पवार व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वागत केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी न बोलता निवासस्थान गाठले.
मात्र रात्री पुन्हा विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीत कसलेही मतभेद नाहीत हे आम्ही आधीही सांगितले.आज एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने काही लोकांच्या मनात ज्या काही शंका कुशंका होत्या त्या दूर झाल्या. तीनही पक्षांचे नेते एकत्र बसून उद्या आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या समवेत बैठक होईल त्यांचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य राहील. दरम्यान, उद्या मुख्यमंत्री ठरणार का, सरकार स्थापन होणार का, या संदर्भात छेडले असता उद्यापर्यंत वाट पहा असे सूचक विधान करीत फडणवीस रवाना झाले.