क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कारखानदारांना ‘अल्टिमेटम’!
लातूर (Krantikari Shetkari Sanghtana) : ऊसक्षेत्र कमी असल्याने चालू गळीत हंगामामध्ये उसाच्या कांडीला सोन्याचा भाव येणार असून एक डिसेंबरपर्यंत साखर कारखानदारांनी आपल्या कारखान्याकडून दिला जाणारा भाव जाहीर करावा; अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
सध्या सर्वच साखर कारखान्यांनी गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगाम शुभारंभ थाटामाटात केला आहे. प्रत्येक वर्षी मोळी गव्हाणीत टाकल्यानंतर लगेच उसाचा पहिला हप्ता किंवा उसाचा दिला जाणारा दर जाहीर करण्यात येत होता. परंतु यंदा 50 टक्के ऊस उपलब्ध असल्याने सर्वाधिक दर देण्याची स्पर्धा कारखानदारांमध्ये लागायला हवी होती. एवढी भयानक परिस्थिती असताना एकाही कारखान्याने अद्याप उसाचा दर जाहीर केला नाही . उसाची कमतरता असल्यामुळे कारखाने दोन-तीन महिन्यापेक्षा जास्ती चालणार नाहीत. तरी कारखान्याकडून भाव जाहीर झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाला तोडी घेऊ नयेत. कारखान्याचे कर्मचारी फडावर आल्यानंतर शेतकऱ्यांनी ऊस दराबाबत खुलासा करून घ्यावा, असे आवाहन संघटनेने केले आहे.
संघटनेचे नेते सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, अरुणदादा कुलकर्णी, नवनाथ शिंदे, रामदास आबा, राजीव कसबे, अशोक दहिफळे, माधव कवठाळे, प्रज्योत हुडे, अमर हैबतपुरे, श्रीराम चव्हाण, शितलताई तमलवाड, नारायण नरखेडकर, दगडू बर्डे, दगडू पडिले, अमित सूर्यवंशी, सिदाजी जगताप, राम बिराजदार, मुस्तशीन मुंजेवार, धनाजी बरगाले, धनाजी जाधव, धनाजी धानोरे, हनुमंत कातळे, रौप शेख, बशीर पठाण, हिराचंद जैन, संतोष गायकवाड व संगमेश्वर जावळे आदींनी हा इशारा दिला आहे.