चीनमधील शी जिनपिंग यांच्या सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. सलग तिसऱ्यांदा सरकारमधील संरक्षणमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. सरकारनेही चौकशीचे आदेश दिले आहेत. एका वृत्तानुसार, संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जुन यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी हादरली आहे. फायनान्शिअल टाईम्सने बुधवारी वृत्त दिले की, डोंग जून विरोधात चौकशी सुरू झाली आहे.
फायनान्शिअल टाईम्सने माजी यूएस अधिकाऱ्यांचा हवाला देत वृत्त दिलं आहे की, कथित भ्रष्टाचारप्रकरणी चौकशीला सामोरे जाणारे डोंग हे सलग तिसरे चीनचे संरक्षण मंत्री आहेत. मात्र चीनच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
गेल्या वर्षभरापासून चिनी सैन्यात भ्रष्टाचारविरोधी व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. किमान नऊ पीएलए जनरल आणि काही संरक्षण उद्योग अधिकाऱ्यांना आतापर्यंत राष्ट्रीय विधान मंडळातून काढून टाकण्यात आले आहे. यातच नवीन आरोपांमुळे चिनी सरकारची चिंता वाढली आहे.
दरम्यान, डोंग यांच्या आधीचे दोन माजी संरक्षण मंत्री ली आणि वेई फेंगे यांना भ्रष्टाचारात गुंतलेले आढळल्यानंतर जूनमध्ये कम्युनिस्ट पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यावेळी पक्षाने आपल्या निवेदनात म्हटलं होतं की, या दोघांनी पक्षाचा विश्वासघात केला आहे आणि केंद्रीय लष्करी आयोगाने घोटाळा केला आहे. यामुळे पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे.