– अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी
हिंगोली (Hingoli Annual Yojana) : जिल्हा वार्षिक योजनेत चालू वर्षासाठी 40 टक्के तरतूद प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने जिल्हा वार्षिक योजनेतील उल्लेखनीय दायित्वाच्या कामाचे प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आयोजित आढावा बैठकीत दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेची (Hingoli Annual Yojana) आढावा बैठक अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
चालू वर्ष सन 2024-25 साठी निधी मागणी व प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. सन 2025-26 चे प्रारुप आराखडे परिपूर्ण स्वरुपात सादर करावेत. तसेच सदरचे आराखडे आयपासवर अपलोड करावेत. मागील वर्ष सन 2023-24 च्या दायित्वाचे प्रस्ताव विलंबाच्या सुस्पष्ट कारणासह सादर करावेत. ज्या विभागाचे उपयोगिता प्रमाणपत्र राहिलेले आहेत, त्यांनी तातडीने उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावेत, अशा सूचना विभाग प्रमुखांना अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी यावेळी दिल्या.
यासोबतच अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी मृद व जलसंधारण, पशुसंवर्धन, मत्स्यविभाग, वनीकरण विभाग, जलयुक्त शिवार, पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना, पाटबंधारे, पूरनियंत्रण, क्रीडा, पाणीपुरवठा, स्वच्छता, नगरविकास, पर्यटन, ऊर्जा, महिला व बालकल्याण, रस्ते व पूल, पर्यटन विकास आदी विविध योजनांसह अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनांचा आढावा घेऊन सूचना केल्या.
यावर्षी संविधानाचा अमृत महोत्सव वर्षभर साजरा करण्यात येणार आहे. या (Hingoli Annual Plan) अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर संविधान अभियान’ राबविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये यासह सर्व शासकीय कार्यालयांनी आपल्या कार्यालयात दर्शनी भागात संविधान उद्देशिका लावण्यात यावी. तसेच शाळा, महाविद्यालयामध्ये संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करावेत. विविध स्पर्धा, व्याख्याने आयोजित करावेत. ही मोहिम लोकचळवळ स्वरुपात राबवून ही मोहीम यशस्वी करावी, अशा सूचना केल्या.
तसेच मुख्य सचिव व विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे संविधान दिवस व अन्य कार्यक्रम घेणे, जिल्हा व तालुकास्तरावर संविधान भवन निर्माण करणे, पर्यटन विभागाच्या योजना, विकास कामे, जलयुक्त शिवार अभियान यासह (Hingoli Annual Plan) जिल्ह्यात राबविण्यात येत असलेले मोठे प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, रस्ते, रेल्वे प्रकल्प, बंधारे, मनरेगा, सिंचन विहिरी, शेततळे, ग्रामसडक योजना, मागेल त्याला सौर पंप, सिंचन प्रकल्प, पिक विमा योजना, वार रुम प्रकल्प (भूसंपादन), सीएम डॅशबोर्ड, ई-ऑफिस, ग्रीव्हन्स रिड्रेसल आदी कामाचा मुद्देनिहाय माहिती तात्काळ सादर करावी, अशा सूचनाही श्री. परदेशी यांनी यावेळी दिल्या.