हिंगोली (Narayana International School) : शहरातील महावीर नगरमध्ये नारायण इंटरनॅशनल स्कुलला शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता नसताना ही शाळा सुरूच आहे. या संदर्भात शिक्षण विभागाने शाळा बंदीचे अंतीम आदेश देऊनही शाळा सुरूच असल्याने शिक्षण विभागाच्या आदेशाला कोलदांडा दिला जात आहे. त्यामुळे काही जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी बोंबाबोंब आंदोलन करून उपोषणाचा इशारा दिला.
याप्रकरणी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, हिंगोली शहरातील महावीर नगर भागात नारायणा (Narayana International School) इंटरनॅशनल स्कुलला कोणत्याही प्रकारची शिक्षण विभागाची मान्यता यु-डायस क्रमांक नसताना मागील सहा महिन्यांपासून आजपर्यंत ही शाळा सुरूच आहे. मध्यंतरी शिक्षणाधिकार्यांनी १६ एप्रिलला प्रसिद्धी पत्रक काढून पालकांनी आपल्या पाल्यास व या शाळेत प्रवेश घेऊ नये असे कळविले होते; परंतु शाळा व्यवस्थापन समितीने पालकांची दिशाभूल करून विद्यार्थ्यांचे इयत्ता पहिली ते सातवीमध्ये प्रवेश प्रक्रिया करून शाळा सुरू ठेवली आहे. सदर शाळा बंद करण्याचे आदेश असताना ही शाळा सुरू राहिल्याने याबाबत शंका-कुशंका घेतल्या जात आहेत.
याबाबत शिक्षण विभागामार्फत २३ऑक्टोंबरला चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीच्या सदस्यांनी शाळेवर जाऊन चौकशी केली असता सदर शाळा सुरू असल्याचे त्यांना निदर्शनास आले. २५ ऑक्टोंबरला शाळा व्यवस्थापन समितीला अंतीम आदेश देऊन आरटीई १८ (५) नुसार दंडात्मक कार्यवाही बाबत १ लाख रूपये व त्यानंतर शाळा सुरू ठेवल्यामुळे प्रती दिन १० हजार रूपये प्रमाणे ८४ दिवसाप्रमाणे ८ लाख ४० हजार रूपये आणि दंडात्मक रक्कम १ लाख रूपये असे ९ लाख ४० हजार रूपये शाळेने दंड भरणा आवश्यक असे सूचविले होते.
परंतु असे न करता ७ नोव्हेंबर पासून ही शाळा पूर्ववत सुरू ठेवून गटशिक्षण अधिकार्यांच्या आदेशाची पायमल्ली केली असल्याचा आरोप निवेदनाद्वारे केला आहे. त्यामुळे या शाळेची योग्य ती चौकशी करून दोषीवर कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा नाईलाजास्तव प्रशासनाच्या विरूद्ध २७ नोव्हेंबर रोजी शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर शिक्षण विभागाच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन करून आमरण उपोषण करावे लागेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुनीरखाँ कौसरखाँ पठाण यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.