पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवतीर्थावरील आजची सभा फ्लॉप शो ठरला. या सभेला मोठी गर्दी जमवण्यासाठी महायुतीने जोरदार जाहिरातबाजी केली मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मोदींच्या सभेला मैदानभर खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या. मोदींची शिवतीर्थावरील सभा रिकाम्या खुर्च्यांनी गाजली, अशा पोस्टचा पाऊसच या सभेनंतर सोशल मीडियावर पडला. रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ चांगलाच क्हायरल झाला.
z महाराष्ट्रात निवडणूक प्रचारात बटेंगे तो कटेंगेची घोषणा भाजपच्या अंगलट आली आहे. त्यामुळेच शिवतीर्थावरील प्रचारसभेत मोदींचा सूर बदलला आणि त्यांनी एक है तो सेफ है…इतकाच नारा दिला.
z सभेला महायुतीचे उमेदवार झिशान सिद्दीकी आणि नवाब मलिक यांची कन्या सना मलिक उपस्थित नव्हत्या.
z मोदी यांच्या सभेत बुरखाधारी मुस्लिम महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यावर संताप व्यक्त करत आम्ही यांना मत देणार नाही, अशी प्रतिक्रिया या महिलांनी दिली.
अजित पवारांची सभेला दांडी
बटेंगे तो कटेंगे या घोषणेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघड विरोध केला असून मोदींच्या आजच्या सभेला अजित पवार अनुपस्थित राहिल्याने त्याबाबत अनेक तर्क लावले गेले.
नवी मुंबई विमानतळाला दि.बां.चे नाव देण्याबाबत मोदींनी चकार शब्द काढला नाही
प्रचारसभेसाठी पनवेलमध्ये आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळ, अटल सेतू, सेमी कंडक्टर, डेटा सेंटर अशा विविध प्रकल्पांचा उल्लेख केला. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नावही घेतले. पण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल याबद्दल मोदी यांनी चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे या विमानतळाला मोदी यांना अदानी यांचे नाव द्यायचे आहे काय, असा संतप्त सवाल भूमिपुत्रांनी केला आहे. मोदी यांची आज खारघरच्या सेंट्रल मैदानावर सभा झाली.