पोखरापूर : गावोगावचे कार्यकर्ते मतदार यांनी दिलेली साथ यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले. बुधवारी (दि. 20) झालेल्या मतदान प्रक्रियेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत 69.65 मतदान झाले होते.
मोहोळ विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख 31 हजार 458 मतदार आहेत. यामध्ये पुरुषांचे झालेले मतदान एक लाख 23 हजार 689 तर एक लाख सात हजार 155 स्त्री मतदारांनी मतदान केले. दुपारी एक वाजेपर्यंत 30.51 टक्के मतदान झाले होते. अनेक मतदान केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. पण दोननंतर मात्र मतदान प्रक्रियेचा वेग वाढत गेला. दुपारच्या सत्रात महिला वर्गाने मतदान केंद्रावर रांगा लावून मतदान केले. मंदावलेली मतदानाची प्रक्रिया चार नंतर पुन्हा जास्त प्रमाणात सुरू झाली. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील 235, उत्तर सोलापूर तालुक्यातील 60, पंढरपूर तालुक्यातील 41 अशा एकूण 336 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया झाली.
मोहोळ तालुक्यातील दादपूर, कामती खुर्द, पापरी, वडदेगाव, देवडी, कोरवली, गलंदवाडी, सय्यद वरवडे, पेनूर व अंकोली या दहा गावांची आदर्श मतदान केंद्र म्हणून निवड केली होती. 168 मतदान केंद्रावर वेब कॅमेरे बसविले होते. तसेच निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत सर्वत्र ड्रोन कॅमेर्याद्वारे पोलिसांची नजर होती. महायुतीचे उमेदवार आमदार यशवंत माने, माजी आ. राजन पाटील, माजी आ. रमेश कदम, विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे, उमेश पाटील, दीपक गायकवाड, विजयराज डोंगरे, संजय क्षीरसागर, मानाजी माने, रमेश बारसकर, चरणराज चवरे आदींसह सर्वच उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी मोहोळ विधानसभेतील मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
वाढलेल टक्का कोणाच्या फायद्याचा
सन 2019 च्या मोहोळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी 65.69 टक्के मतदान झाले होते. तर यंदा 69.65 मतदान झाले. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात मागील विधानसभेच्या मतांच्या टक्केवारीपेक्षा चार टक्क्यांनी वाढलेला मतांचा टक्का कोणाला फायदा व कोणाला तोटा देणारा राहील हे शानिवारी (दि. 23) निकालानंतरच स्पष्ट होईल.