युक्रेनने ऑगस्टमध्ये रशियाच्या कुर्स्क भागात अचानक हल्ले केले होते. यावेळी युक्रेनने कुर्स्कचा मोठा प्रदेश ताब्यात घेतला होता. मात्र, आता रशियाने युक्रेनच्या ताब्यातून 40 टक्के जमीन परत मिळवली आहे. रशियाने कुर्स्क भागात 59 हजार सैनिक तैनात केले आहेत.
युक्रेनच्या अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने कुर्स्क प्रांतातील 1376 चौरस किमी जमीन ताब्यात घेतली होती. मात्र, रशियाच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हे क्षेत्र आता केवळ 800 चौरस किमी इतके कमी झाले आहे. शत्रू सतत हल्ले करत आहेत, पण आम्ही हा परिसर आमच्या ताब्यात ठेवू.
रशियाने डागले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र
गेल्या आठवडय़ात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युव्रेनला रशियामध्ये खोलवर हल्ला करण्याची परवानगी दिली होती. यानंतर 19 नोव्हेंबरला पहिल्यांदा युक्रेनने रशियाच्या ब्रायन्स्क भागात अमेरिकेकडून मिळालेली 6 लांब पल्ल्याची एटीएसीएमएस क्षेपणास्त्रे डागली. रशियाने 5 क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे.
रशियाने उत्तर कोरियाचे सैन्य केले तैनात
युक्रेनच्या जनरल स्टाफने सांगितले की, रशियाने कुर्स्कमध्ये सुमारे 11 हजार उत्तर कोरियाचे सैनिक तैनात केले आहेत. मात्र, त्यापैकी बहुतांश जण अजूनही प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. युव्रेनच्या या दाव्याला रशियाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.