Published on
:
24 Nov 2024, 1:00 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:00 am
मराठा आरक्षणासह पक्षनिष्ठाद्रोहापर्यंत वैविध्यपूर्ण मुद्द्यांमुळे निर्माण झालेल्या वावटळीतून वाट काढत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यातून निर्भेळ विजयाची नोंद केली. राज्यातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या येवल्यात भुजबळ यांनी 40 हजारांच्या मताधिक्यासह सलग पाचव्या विजयाची नोंद केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या लढतीमध्ये भुजबळ यांनी मविआच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव केला. राज्याच्या राजकारणात ओबीसींचे प्रमुख नेते म्हणून भुजबळ यांची सार्वत्रिक ओळख आहे. मराठा आरक्षण मुद्द्यावर मनोज जरांगे यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध करण्याचे धाडस केलेल्या भुजबळ यांच्या पाडावासाठी विविध नेत्यांनी ऐक्याची वज्रमूठ आवळली होती. विशेषत: राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी नमनाची सभा येवल्यात घेत भुजबळ यांना लक्ष्य केले होते. आताच्या निवडणुकीतही येवल्यातील आपले कट्टर समर्थक माणिकराव शिंदे यांना रिंगणात उतरवून पवार यांनी मराठा कार्ड बाहेर काढले. मराठा समाजासह येवल्यात निर्णायक मानल्या जाणार्या वंजारी समाजालाही आपल्याकडे वळवून पवार यांनी भुजबळ यांची पुरती कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरळ लढतीत भुजबळ यांचे निवडणूक व्यवस्थापन निर्णायक ठरले आणि त्यांनी विजयाची मोहोर उमटवली.
येवला आणि भुजबळ असे जणू समीकरण बनले असून, हा मतदारसंघ गेल्या दोन दशकांपासून भुजबळ यांचा बालेकिल्ला बनला आहे. 1995 मध्ये मुंबईच्या माझगावमध्ये पराभूत झाल्यानंतर आपले राजकीय बस्तान बसवण्यासाठी भुजबळ यांनी येवल्याची निवड केली. यावेळी मराठा आरक्षणाचे विरोधक म्हणून राज्यभर निर्माण झालेली प्रतिमा त्यांना त्रासदायक ठरली. स्वाभाविकच मराठाबहुल येवला मतदारसंघात त्यांच्या विरोधात रान पेटवले गेले; मात्र या सगळ्या आव्हानांवर मात करीत भुजबळ यांनी आपणच बाहुबली असल्याचे सिद्ध केले.
रेड कार्पेट टाकणारे शिंदेच!
नव्या राजकीय इनिंगसाठी भुजबळ यांनी मुंबई सोडून येवल्यात यावे, अशी आग्रही भूमिका घेणार्यांमध्ये माणिकराव शिंदे हे अग्रस्थानी होते. असे असूनही त्यांनी 2009 आणि यंदा अशी दोनदा भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवली. दोन्ही वेळी त्यांना पराभव चाखावा लागला. येवल्यात भुजबळ यांना रेड कार्पेट टाकणार्या शिलेदाराला पुन्हा पराभव पत्करावा लागल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.