डोनाल्ड ट्रम्प रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यासाठी ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार. Pudhari File Photo
Published on
:
25 Jan 2025, 12:24 am
Updated on
:
25 Jan 2025, 12:24 am
नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धात तोडगा काढण्यासाठी सौदी अरेबियासह ओपेक संघटनेतील देशांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. दरम्यान, दोन्ही देशांतील युद्ध रोखण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यासाठी ट्रम्प यांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. सौदी अरेबियासह ओपेक राष्ट्रांनी इंधनाचे दर कमी केल्यास दोन्ही देशांतील तणाव निवळण्यास मदत होणार असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, दोन्ही देशांतील युद्ध रोखण्यासाठी पुतीन यांना भेटण्याची गरज आहे. पुतीन यांनीही तशी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आमची भेट लवकरच होईल. दोन्ही देशांतील सैनिक युद्धात मरण पावत आहेत. अशा प्रकारे सैनिकांचा मृत्यू होणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यामुळेच दोन्ही देशांतील युद्ध तत्काळ थांबले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी जाहीर केली. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनीही ट्रम्प यांना भेटण्याची तयारी दर्शविली आहे. ट्रम्प आणि पुतीन यांनी भेटण्याची तयारी दर्शविली असली, तरी ते कुठे आणि कधी भेटणार, याबाबत तपशिलात माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, अमेरिकेला जगाची राजधानी बनविणार असल्याचा निर्धार ट्रम्प यांनी व्यक्त केला. क्रिप्टोकरन्सीच्या दुनियेमध्येही अमेरिका केंद्रस्थानी राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यासाठी समिती नियुक्त केल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले.
तिसर्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी हालचाली
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना जास्तीत जास्त दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होता येते. ट्रम्प यांनी दुसर्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. आता त्यांनी तिसर्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या आहेत.
विदेशातून अमेरिकेत बेकायदा स्थलातंर केलेल्या नागरिकांविरोधात ट्रम्प यांच्या सरकारने कठोर कारवाई सुरू केली आहे. 500 स्थलांतरितांना अटक करण्यात आली असून त्यांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात येणार आहे. ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर तीन दिवसांत 538 बेकायदा स्थलांतरितांना अटक करून त्यांची त्यांच्या देशात रवानगी करण्यात आली आहे.