Published on
:
25 Jan 2025, 12:00 am
Updated on
:
25 Jan 2025, 12:00 am
भूकंप ही अचानक घडणारी प्रक्रिया असून त्यामुळे सगळे जग हादरून जात असते. जमिनीखाली, भूगर्भात काहीतरी घटना घडतात, हालचाली होतात आणि जमीन दुभंगण्याच्या मार्गावर येते आणि यामुळे जो धक्का बसतो त्याला भूकंप असे म्हणतात. उर्दू, हिंदीमध्ये याला जलजला असे म्हणतात. आपल्या राज्यामध्ये नेहमी राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असते. गेले वर्षभर आपण अशा भूकंपाचे अनेक अनुभव घेतले आहेत. आमच्या हे लक्षात येत नाही की, एवढी उलथापालथ झाल्यानंतर राज्यामध्ये कोणता भूकंप येण्याचा बाकी आहे?
नुकतेच काही राजकीय नेत्यांनी लवकरच आणखी एक राजकीय भूकंप होणार, असे भाकित वर्तविले आहे. राजकीय भूकंप हे सत्ताधारी पक्षांमध्ये होत नाहीत. कारण, सगळेजण सत्तेची फळे चाखण्यात मशगूल असतात. जे काय भूकंप व्हायचे होते कदाचित त्यांनी आधीच केले होते. त्यामुळे आता वेगळा भूकंप सत्ताधारी पक्षात होत नसतो. याचवेळी विरोधी पक्षात मात्र अस्वस्थता असते. जे काय निवडून आलेले दहा-पंधरा खासदार, आमदार असतील ते पुढील पाच वर्षे हातावर हात ठेवून बसायला तयार नसतात. त्यांनाही आपल्या मतदारसंघाचा आणि जनतेचा विकास करायचा असतो. अशा अस्वस्थ लोकांना हेरून आपल्या पक्षात आणणे यालाच आजकाल राजकीय भूकंप असे म्हणतात. न्यूज मीडिया आणि इतर पत्रकारांनी ‘याला दणका, त्याला धक्का’ अशा शब्दांचा सराव आपल्याला करून दिला आहे. त्यातच हा नवीन शब्द आला आहे आणि तो म्हणजे राजकीय भूकंप. राजकीय भूकंपामध्ये सहभागी असणारे बहुतांश लोक हे माजी खासदार किंवा माजी आमदार किंवा मागील निवडणुकीमध्ये ज्यांना पक्षाने तिकीट दिले नसते, ज्याला ते अन्याय म्हणत असतात असे अस्वस्थ आमदार आपल्या गळाला लागले की, विरोधी पक्षाला धक्का बसत असतो. हाच राजकीय भूकंप असतो. सध्या उबाठा गटाला असा धक्का बसण्याची शक्यता जास्त आहे. याचे कारण नेते, कार्यकर्ते, तिकीट न मिळालेले माजी आमदार, मनपा निवडणूक लढवण्याची इच्छा असलेले भावी नगरसेवक आणि एकंदरीतच त्यांचे कार्यकर्ते हे सर्व अस्वस्थ आहेत. त्यामुळे राजकीय भूकंपाचे केंद्र उबाठामध्ये असू शकते.
राजकीय भूकंपाचे काही परिणाम होतात का, या विषयाचा आपण अभ्यास करता असे लक्षात येईल की, त्याचा परिणाम होत असतो. कार्यकर्ते इकडून तिकडे जात असतात. कार्यकर्ता हा कोणत्याही पक्षाचा कणा असतो आणि कणा हलल्याबरोबर पूर्ण शरीर हलते आणि भूकंपसद़ृश परिस्थिती निर्माण होते. राजकीय भूकंप होऊ नये, यासाठी आटोकाट प्रयत्न प्रत्येक पक्ष करत असतो; परंतु चोरून झालेल्या गाठीभेटी, झालेले ऑडिओ, व्हिडीओ संभाषण या माध्यमातून पक्षांतर सतत होत असते. या पक्षांतराचे चटके आणि झटके खाण्याची तयारी प्रत्येक पक्षाने ठेवलेली असते. सत्ताधारी पक्ष निवांत असतो. कारण, त्याचे आमदार सोडून जात नाहीत, ना त्याचा कोणी कार्यकर्ता सोडून जातो. आपले राज्य पातळीवरील किंवा विकासाचे किंवा निधीचे कोणतेही काम व्हायचे असेल सत्ताधारी पक्षासोबत राहणे ही अपरिहार्यता असते. हे लक्षात घेऊनच राजकीय भूकंप होत असतात. सद्यस्थितीत विरोधी पक्षांना ‘रात्र वैर्याची आहे’ हे समजून सावध राहिले पाहिजे म्हणजे, राजकीय भूकंपाचा झटका त्यांना बसणार नाही.