भारतीय रेल्वे सातत्याने कात टाकत पुढे जात आहे. ज्या ठिकाणी कधीच रेल्वे गेली नाही, अशा ठिकाणीही आता रेल्वेचं जाळं विणलं जात आहे. रोज लाखो लोक रेल्वेतून प्रवास करत आहेत. अत्यंत सोयीस्कर, सोपा आणि स्वस्तातील प्रवास असल्याने लोक रेल्वेने जाण्यावर अधिक भर देत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेनेही जीआरपी आणि आरपीएफचे जवान तैनात केलेले असतात. या जवानांची 24 तास ड्युटी असते. प्रवासी सुखरूप घरी पोहोचावेत म्हणून ही काळजी घेण्यात आलेली असते. पण कधी कधी अशाही काही घटना घडतात की त्या कल्पनेच्या पलिकडे असतात. जेव्हा जीआरपीच्या जवानांनी स्टेशनवर एकटीच असलेल्या मुलीला जेव्हा विचारलं कुठून आलीस? तेव्हा…
जीआरपी पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर हे बेवारस मुलगी सापडली. तिचं वय 12 वर्ष असेल. तिची मेडिकल करण्यात आली. तेव्हा तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे जीआरपीच्या पोलिसांनाही दरदरून घाम फुटला. नवी मुंबईतील घनसोली रेल्वे स्टेशनवर ही मुलगी एकटीच बसलेली होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि तिची मेडिकल टेस्ट केली. त्यात तिच्यावर बलात्कार झाल्याचे संकेत मिळत आहेत. जीआरपी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जीआरपी पोलीस आता आरोपी आणि या मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.
गस्तीवर असतानाच दिसली
ही मुलगी सोमवारी घनसोली रेल्वे स्थानकात होती. जीआरपीचे जवान नियमित गस्तीवर होते. त्यावेली या जवानांची एकट्याच बसलेल्या या मुलीकडे लक्ष गेले. सीनिअर पोलीस निरीक्षक राजेश शिंदे यांनी या मुलीला तिचं विचारलं. तू कुठून आलीस? तुझ्यासोबत कोण आहे? एकटीच स्टेशनवर काय करतेस? असं या मुलीला राजेश शिंदे यांनी विचारलं. पण ही मुलगी काहीच सांगू शकली नाही. तिला तिचं नावही सांगता आलं नाही. या मुलीची हालत पाहून आम्ही तिची मेडिकल केली, असं राजेश शिंदे यांनी सांगितलं. या मुलीच्या कुटुंबीयांना आता पोलीस शोधत आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या हवाली मुलगी परत करायची आहे. पण मुलगी काहीच सांगत नसल्याने तिच्या आईवडिलांचा शोध घेणं कठिण झालं आहे.
मुलीला मानसिक धक्का
ही अल्पवयीन मुलगी आता काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नाही. तिला धक्का बसला असावा, असं जीआरपी पोलिसांनी सांगितलं. दुसरीकडे पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. तसेच अज्ञात व्यक्तींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतात रोज शेकडो गाड्या धावतात. मुंबईत तर मिनिटा मिनिटाला लोकल धावते. यावेळी तुफान गर्दी असते. त्यामुळे एकाच वेळी एवढ्या प्रवाशांची सुरक्षा पाहणं आव्हानच असतं. अशा वेळी अशा घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसतो.