रत्नागिरी : मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदार रांगांमध्ये महिलांची गर्दी अधिक पाहायला मिळाली.pudhari photo
Published on
:
22 Nov 2024, 12:50 am
Updated on
:
22 Nov 2024, 12:50 am
रत्नागिरी : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघांसाठी बुधवारी झालेल्या मतदानात अंतिम आकडेवारी प्रशासनाने जाहीर केली असून, जिल्ह्यात सरासरी 65.23 टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत 2019 च्या तुलनेत चार टक्क्यांची मतदानात वाढ झाली आहे. सर्वाधिक 69.04 टक्के चिपळूण मतदारसंघात तर सर्वात कमी गुहागर 61.79 टक्के इतके मतदान झाले आहे. मतदानामध्ये 4 लाख 46 हजार 470 महिला, 4 लाख 27 हजार 363 पुरुष तर इतर 4 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी विविध ठिकाणी मतदान केंद्रांवर बुधवारी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याची सरासरी 61.22 टक्के होती, तर लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याची सरासरी 59.77 टक्के होती. 2024 च्या लोकसभेत जिल्ह्याची सरासरी 58.03 टक्के होती. या तुलनेत बुधवारी झालेल्या मतदानात चार टक्क्यांची वाढ झाली आहे. बुधवारच्या मतदानादिवशी 2 बीयू, 2 सीयू आणि 5 व्हीव्हीपॅट बदलण्यात आले.(Maharashtra assembly polls)
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय बुधवार, दि. 20 रोजी दापोली मतदारसंघात 94 हजार 979 पुरुष, 99 हजार 718 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात 66.84 टक्के मतदान झाले.
गुहागर मतदारसंघात 70 हजार 583 पुरुष, 79 हजार 374 महिला मतदारांनी मतदान केले. असे 61.79 टक्के मतदान झाले. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात पुरुष- 90 हजार 651, महिला- 94 हजार 938 आणि इतर 4 जणांनी मतदान केले. या ठिकाणी 63.73 टक्के मतदान झाले. राजापूरमध्ये पुरुष- 75 हजार 334, महिला- 77 हजार 664 जणांनी मतदान केले असून याठिकाणी 64.17 टक्के मतदान झाले.
जिल्ह्यातील 4 लाख 27 हजार 363 पुरुष तर 4 लाख 46 हजार 470 महिला व 4 इतर मतदार अशा एकूण 8 लाख 73 हजार 837 मतदारांनी काल मतदानाचा हक्क बजावला. पुरुषापेक्षा महिलांनी अधिक मतदान केले. राज्याचे विशेष सामान्य निरीक्षक राम मोहन मिश्रा, सामान्य निवडणूक निरीक्षक सुमित जरांगल, सामान्य निवडणूक निरीक्षक जनक प्रसाद पाठक, खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार आणि निवडणूक निरीक्षक राजेंदर प्रसाद मीना (पोलीस) यांनी बैठक घेऊन तसेच वेळोवेळी मार्गदर्शन केले होते. शांततेत मतदान होण्यासाठी उमेदवारांचेही चांगले सहकार्य लाभले. तसेच जिल्हा प्रशासनाने मतदान जनजागृती उपक्रम राबविले होते. विशेषत: मच्छिमारांसाठी केलेल्या आवाहनाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाल्याचे निवडणूक अधिकार्यांनी सांगितले.(Maharashtra assembly polls)
चिपळूणमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे मतदान अधिक
पाच विधानसभा पैकी चिपळूणमध्ये महिलांपेक्षा पुरुषांनी अधिक मतदान केले असून, उर्वरीत चारही मतदार संघात पुरुषांपेक्षा मतदान करणार्या महिलांची संख्या अधिक आहे.
इतर मतदारसंघाच्या तुलनेत महिलांचे सर्वाधिक मतदान चिपळूणात
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात पुरुष- 95 हजार 816, महिला- 94 हजार 776 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याठिकाणी 69.04 टक्के मतदान झाले. चिपळुणात महिलांपेक्षा पुरुषांचे अधिक मतदान झाले असले तरी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान हे इतर मतदारसंघाच्या तुलनेत चिपळूणात मतदारसंघात महिलांचे झालेले दिसून येत आहे.
दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअरची सुविधा
प्रशासनामार्फत मतदारांसाठी मंडप, पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, आरोग्य सुविधा आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा निवडणूक अधिकारी सिंह आणि पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.