लेख – महाराष्ट्रधर्माची ‘मशाल’ पेटविण्याची गरज!

6 days ago 1

>>अजित कवटकर, [email protected]

106 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे एकसंध राहिलेला हा अखंड महाराष्ट्र, आज मात्र काही सत्तांधांच्या विकृत राजकारणामुळे आपल्या संस्कार-संस्कृतीची शान हरवू लागला आहे. महाराष्ट्र याअगोदर कधीच कमजोर झालेला वाटला नव्हता. दिल्लीचेही तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राची निर्विवाद महानता टिकवायची असेल, समर्थ करायची असेल तर या वेळी निवडणुकीतून परिवर्तन घडवून आणणे अत्यावश्यक आहे. त्यासाठीच महाराष्ट्रधर्माची धगधगणारी, भगव्या ज्वाळांची स्वाभिमानी ‘मशाल’ पेटवायची गरज आहे.

महाराष्ट्र म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाकरे, हे समीकरण ‘सत्य’ आहे, लोकमान्य आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढय़ापासून ते आजतागायत जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या अखंडतेला, अस्मितेला, स्वाभिमानाला ज्याने कोणी नख लावण्याचा साधा विचारदेखील केला, तर त्या विकृतीला वठणीवर, शुद्धीत आणणारा पहिला पंजा ज्याने कोणी मारला तो बाळासाहेबांच्या विचारांचा आणि त्यांचा शिवसैनिक शोभणारा मर्द मावळा होता. सत्तेत असो वा नसो, परंतु जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी निःस्वार्थपणे व उत्स्फूर्तपणे उतरायचे हाच पुढे जणू शिवसेनेचा गुणधर्म झाला. महाराष्ट्रावर, भूमिपुत्रावर, संस्कृतीवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढण्याची ती परंपरा आजही या मूळ संघटनेची ओळख आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे समाजकारणच तिच्या राजकारणाचा कणा आहे. त्यामुळे कपटी षड्यंत्राच्या आघातांनंतरदेखील ते निडरपणे, कणखरपणे, आत्मविश्वासाने ‘मशाल’ घेऊन महाराष्ट्र जिंकण्याच्या जिद्दीने, सर्वसमावेशक प्रगती घडविण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रणांगणात झेपावले आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर कोणाची सत्ता असणार, यावर महाराष्ट्राचे भवितव्य ठरणार आहे. कुणी कुणाला मत द्यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि प्रत्येक सुज्ञ मतदार हा पूर्ण विचारांती यावरील आपले मत ठरवेल, परंतु मत देण्याअगोदर आज प्रत्येक मतदाराने काही गोष्टींवर विचार करणे आवश्यक आहे. स्वतःसाठी व महाराष्ट्रासाठी.

महाराष्ट्रात चाललेल्या घाणेरडय़ा राजकारणामुळे महाराष्ट्र आज सर्वत्र कुणामुळे बदनाम झाला आहे? सत्तास्वार्थासाठी तोडाफोडीच्या गलिच्छ राजकारणाचा प्रसार कोण करत आहे? पक्ष फोडणे, ब्लॅकमेल करून धमकावणे, आमदार पळविणे, असंवैधनिक राजकारण करणे, स्वायत्त संस्था-यंत्रणांचा वापर करणे, सतत खोटय़ा बातम्या पेरून जनमानसात संभ्रम, संशय, संताप निर्माण करण्यासारख्या गोष्टी आज कोण सतत करत आहे? आज महाराष्ट्राचे उद्योग शेजारील राज्यांत कोण ढकलत आहे? निवडणुकीच्या अगदी तोंडावर जनतेला भुलविण्यासाठी नवनवीन अव्यवहार्य व परावलंबित्व वाढविणाऱ्या योजनांची खैराती वाटून कोण स्वतःच्या राजकीय उद्धारासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कमजोर करत आहे? देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे हजारो एकर भूखंड कोण कुणाच्या घशात घालत आहे? मुंबई तोडता आली नाही तर भूमिपुत्राला विकत घेऊन बाहेर घालविण्याचे मनसुबे कोण बाळगून आहे? विकासाच्या नावाखाली झाडांची, पर्यावरणाची, वन्य जीवसृष्टीचा कोण विनाश करत आहे? बेरोजगारी, महागाई, शेतकरी वर्गाचे शोषण यांसारख्या गंभीर समस्यांवर उपाय करण्याचे सोडून कोण फक्त आणि फक्त सूडाचे राजकारण करण्यात व्यस्त आहे? महाराष्ट्राचे वाटोळे झाले तरी चालेल, पण आपली सत्ता टिकली पाहिजे, अशा विषारी विध्वंसक विचाराने कोण संचारले आहे? आणि अशांनाच आपण आपले अमूल्य मत देऊन महाराष्ट्राच्या आणि आपल्या स्वतःच्या अधोगतीला कारणीभूत ठरायचे का? नाही!

कट-कारस्थानं करून महाविकास आघाडी सरकार पाडले हे कुणालाही आवडलेले नाही. कारण ते सरकार मानवतावादी शासन प्रणालीचे उत्तम उदाहरण ठरत होते. महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार-प्रशासनाने तेव्हा कोरोना महामारीपासून लोकांना वाचविण्यासाठी महाराष्ट्रभर उभ्या केलेल्या सुसज्ज आरोग्य यंत्रणेचे सर्व स्तरांतून झालेले कौतुक जगजाहीर आहे. तुलनात्मकदृष्टय़ा पाहता त्या कठीण काळातही राज्याची अर्थव्यवस्था मजबूत, सुदृढ ठेवण्याचे यशस्वी प्रयत्न त्या सरकारने करून दाखवले. उद्धव ठाकरे यांचे संयमी, संवेदनशील गुण त्यांच्या सरकारच्या कार्यपद्धतींमधून महाराष्ट्राने अनुभवले. राष्ट्र-राज्य नेतृत्व करणाऱ्याच्या अंगी आवश्यक असणारा वागण्यातील सभ्यपणा, बोलण्यातील नम्रपणा, विचारांचा स्पष्टपणा, विकासाचा बहुआयामी- सर्वसमावेशक दृष्टिकोन, जनकल्याणाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव व त्यासाठीची कार्यतत्परता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांमध्ये आहे हे कोणीही नाकारणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविलेला हा महाराष्ट्र, साधुसंतांचा हा महाराष्ट्र, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्यांचा हा महाराष्ट्र, 106 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे एकसंध राहिलेला हा अखंड महाराष्ट्र, शेतकरी-कष्टकरी-सर्वसामान्यांच्या मेहनतीने समृद्ध झालेला हा महाराष्ट्र, आज मात्र काही सत्तांधांच्या विकृत राजकारणामुळे आपल्या संस्कार-संस्कृतीची शान हरवू लागला आहे. औद्योगिक प्रगतीच्या आर्थिक उच्चांकावरून खाली घसरू लागला आहे. बेरोजगारी, महागाई, अन्याय, भ्रष्टाचाराने त्रस्त, असह्य झालेल्या येथील गरीबांची दैन्यावस्था झाली आहे. महाराष्ट्र याअगोदर कधीच कमजोर झालेला वाटला नव्हता. दिल्लीचेही तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राची निर्विवाद महानता टिकवायची असेल, समर्थ करायची असेल तर या वेळी निवडणुकीतून परिवर्तन घडवून आणणे अत्यावश्यक आहे. त्यासाठीच महाराष्ट्रधर्माची धगधगणारी, भगव्या ज्वाळांची स्वाभिमानी ‘मशाल’ पेटवायची गरज आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article