पुणे : साहित्य संमेलन, नाट्य संमेलन, विश्व संमेलन असो वाद निर्माण झाला नाही तर मराठी संमेलन होऊच शकत नाही. वाद निर्माण करणे हा मराठी माणसांचा स्थायी भाव आहे. याच कारण म्हणजे आपण संवेदशील लोक आहोत. त्यामुळे वाद, विवाद, प्रतिवाद झालाच पाहिजे यातूनच खर्या अर्थाने मंथन होऊ शकते, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्व मराठी संमेलनाबाबत झालेल्या वादावर टिप्प्पणी केली.
राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित तिसर्या विश्व मराठी संमेलनाचे उद्धाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, बापुसाहेब पठारे आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णीक यांना विश्व मराठी साहित्य भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.