विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मानसिक आरोग्याविषयी केली जनजागृती:मानसिक आरोग्य दिनानिमित्त आयोजन; उत्कृष्ट अभिनयाचे दर्शन

2 hours ago 1
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शहरात ठिकठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी जनजागृती केली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मानसशास्त्र विभाग, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय व मानस प्रबोधिनी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची लक्षणे व त्यावरील उपाय यावर पथनाट्याची थीम आधारित होती. प्रथम पथनाट्य अमरावती शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सादर करण्यात आले. पथनाट्याची दुसरी थीम अध्ययन अक्षमता, कामाच्या ठिकाणी असलेला मानसिक ताण आणि भीती या मानसिक आजारांवर आधारित होती. विद्यार्थी सामान्य बुद्धिमत्तेचा असला, तरी त्याला अध्ययन अक्षमता असू शकतात. आज प्रत्येक कामाच्या ठिकाणी कामाचे दडपण व ताण मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिकता ढासळत असून, त्याचे परिणाम स्वतःसह त्यांच्या कुटुंबावरही होत असतात. व्यक्तीला जसजसे जीवनात अनुभव येतात, त्याप्रमाणे त्याचे व्यक्तिमत्व घडत जाते. जीवनात एखादा प्रसंग वाईट आला असेल, तर त्याचा परिणाम त्याच्या पुढील जीवनावर होतो. यातून भीती निर्माण होते. अशा प्रकारच्या मानसिक आजारांबाबत पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. पथनाट्याची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. गजानन रत्नपारखी यांनी पुष्पहार अर्पण करून झाली. या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन मानसशास्त्र विभागाच्या समन्वयक प्रा. अरुणा तसरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. आयोजनाकरिता डॉ. पंकज वसाढकर व त्यांच्या चमूचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाला प्रा. वनिता राऊत, प्रा. श्रद्धा हरकंचे, ऋतुजा ठाकरे, राजू इंगोले तसेच महात्मा फुले महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पथनाट्याची संकल्पना प्रा. मनीषा लाकडे यांची होती. शिवराज कावडकर, नितीन कोल्हे, अनुराधा इंगोले, शुभांगी हिवसे, विनित तायडे, वैष्णवी डहाके, प्रणाली घुले, श्वेता कापणीचोर, वैदवी हिरणावडे, गौरी बुरंगे, पपीहा शिंदे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनय सादर केला. पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्यावर प्रकाश टाकत त्याबाबत जनजागृती केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article