विरोधकांचा आँखों देखा अहवाल, यशवंतरावांचे धीरगंभीर उत्तर:नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनात झाली होती पानशेत धरणफुटीनंतर उडालेल्या हाहाकारावर चर्चा

2 days ago 2
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात बदललेली राजकीय समीकरणे आपण सर्वांनी पाहिली. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील सुसंवाद दिवसेंदिवस कमी होत आहे. अगदी जनतेवरील संकटकाळातही ही मंडळी एकमेकांवर तुटून पडत आहेत. पण याच राज्याने एक काळ असाही पाहिला जेव्हा जनतेच्या हितासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्रितपणे काम करत होते. मी तुम्हाला १९६१ ची गोष्ट सांगत आहे. तेव्हा असे झाले होते की, पानशेतचे धरण फुटल्याने पुण्यात हाहाकार उडाला होता. त्याची पाहणी विरोधी बाकांवर बसलेल्या तत्कालीन दिग्गज नेत्यांनी स्वत: केली. त्यासाठी ते पुण्यामध्ये फिरले आणि दुसऱ्या दिवशी नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनात त्यांनी त्या पाहणीचा आँखों देखा हाल सादर केला. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही त्या नेत्यांची माहिती अतिशय मनापासून, पूर्ण गांभीर्याने ऐकली आणि त्यावर धीरगंभीर स्वरात उत्तर दिले. संकटकाळात पुणेकरांनी दाखवलेले धैर्य अतुलनीय आहे, असे त्यांनी सांगितले होते. महाराष्ट्रात सत्ताधारी अन् विरोधकांत सुसंस्कृत सुसंवादाची पायाभरणीच त्यात यशवंतरावांनी केली होती. गेल्या दीड-दोन महिन्यात पुण्यात पूरस्थिती उद्भवली होती. ती पाहून मला सहा दशकांपूर्वीचा प्रसंग अन् त्यातील नेतेमंडळींचे वर्तन आठवले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र राज्य निर्मितीचा मंगल कलश दिल्ली येथून मुंबईत आणला गेला आणि देशातील एका प्रगतिशील राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते १ मे १९६० रोजी राजभवनात महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळादेखील याच दिवशी पार पडला. त्यानंतर सचिवालय, सचिवालयाचे मंत्रालय असे नामकरण नंतर झाले. या वेळी बोलताना चव्हाण यांनी महाराष्ट्रीय म्हणजे केवळ मराठी भाषा बोलणाराच असे नव्हे, तर जो महाराष्ट्रात राहतो आणि आपल्या शक्तीनुसार जीवन समृद्ध करतो असा प्रत्येक माणूस महाराष्ट्रीय आहे, असे स्पष्ट केले. राज्याचा समतोल विकास करताना मुंबई शहराचे बहुरंगी स्वरूप कायम ठेवले जाईल. मध्य प्रांताच्या राजधानीचा दर्जा सोडून महाराष्ट्रात विलीन झालेल्या नागपूरचे महत्त्व टिकवण्याचाच नव्हे, तर ते वाढवण्याचा सरकारचा कटाक्ष राहील, असे सांगितले. २८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारासंदर्भात त्यांचे ते वक्तव्य होते. त्या करारात “शासनाचे कार्यस्थान अधिकृत निश्चित कालावधीकरिता नागपूर येथे हलवण्यात येईल आणि दरवर्षी राज्य विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपुर येथे भरवण्यात येईल’ अशी तरतूद आहे. नागपुरात अधिवेशनाची ही परंपरा सुरू झाल्यानंतर तिथे पहिले पावसाळी अधिवेशन १४ जुलै ते ३० ऑगस्ट १९६१ या कालावधीत झाले. १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटण्याची मोठी दुर्घटना घडली होती. त्यानंतर सुरू झालेल्या अधिवेशनावर या दुर्घटनेची गडद छाया होती. मुख्यमंत्रिपदी यशवंतराव चव्हाण तर विरोधी बाकांवर आर.डी. भंडारे (विरोधी पक्षनेते), आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, रामभाऊ म्हाळगी, कॉम्रेड ए. बी. वर्धन, कारखानीस, दत्ताजी देशमुख, व्ही.डी. देशपांडे, उद्धवराव पाटील अशा दिग्गजांची फळी होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article