Published on
:
24 Nov 2024, 2:18 pm
नागपूर : विरोधी पक्ष नेतेपदा संदर्भात विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील. मात्र राज्यातील जनतेच्या हिताच्या विरोधकांच्या चांगला सूचनांचा आम्ही आदर करू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
महायुतीच्या महायशाच्या तुलनेत विरोधकांना अतिशय कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे यावेळी विधानसभा विरोधी पक्ष नेत्याविना राहणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचे हे विधान महत्त्वाचे आहे. नागपुरात दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजयानंतर जंगी स्वागत झाले यानिमित्ताने ते बोलत होते. दरम्यान, महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो.
मेहनत, एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, मित्रमंडळी आणि माझा प्रत्येक समर्पित कार्यकर्ता ज्यांनी गेले काही दिवस जिवाचे रान करून वेळ-काळ न पाहता मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, या सर्वांचा मी कायम ऋणी राहीन. या विजयाने एक नवीन दिशा दिली आहे. हे यश आपल्या महाराष्ट्राला एक प्रगतीशील आणि सर्वसमावेशक भवितव्यासोबत मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारतासह विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील असा विश्वास फडणवीस यांनी आज रविवारी व्यक्त केला आहे.