शिर्डी बसस्थानकात स्वच्छता अभियानाला प्रतिसाद:ग्रीन एन क्लीन शिर्डी दशकपूर्ती निमित्त उपक्रमाचे आयोजन, आतापर्यंत 11 हजार रोपट्यांचे केले रोपण

1 day ago 1
साईबाबांची नगरी स्वच्छ व सुंदर करण्याचा ध्यास घेणाऱ्या ग्रीन अॅण्ड क्लीन फाउंडेशनच्या सेवाकार्याची मंगळवारी दशकपूर्ती झाली. यानिमित्त शिर्डी बस स्थानकाची स्वच्छता करण्यात आली. गेल्या दहा वर्षांत ग्रीन एन क्लीनने शहर हिरवाईने नटवण्याबरोबरच शहरातील तरुणांना सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्याची सवय लावली. देशातील अस्वच्छ धार्मिक स्थळ अशी जेव्हा साईनगरीची प्रतिमा होती. तेव्हा सामाजिक भान असलेल्या शहरातील तरुणाईने ग्रीन एन क्लीनच्या माध्यमातून झाडू हाती घेतला. दर मंगळवारी हे तरुण शहरातील गल्ल्या, बसस्थानक, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करीत. दरम्यानच्या काळात नगरपरिषदेला साई संस्थानकडून स्वच्छतेसाठी निधी मिळू लागला. यामुळे स्वच्छतेच्या कार्यातून उसंत मिळताच या तरुणांनी वृक्षारोपणाचे काम हाती घेतले. शहरात तब्बल ११ हजार मोठ्या झाडांची रस्त्याच्या दुतर्फा लागवड केली. संवर्धन केले. यानंतर नगरपरिषदेनेही यात मोठे काम केले. दरम्यान, सामूहिक प्रयत्नांमुळे शहराची अस्वच्छ शहराची प्रतिमा पुसली जावून देशपातळीवर साईनगरीला कोट्यवधी रुपयांचे स्वच्छतेचे पुरस्कार मिळाले. मंगळवारी ग्रीन एन क्लीनच्या सेवाकार्याची दशकपूर्ती झाली. या काळात स्वच्छतेबरोबरच पाच वर्षांपासून शिर्डी परिक्रमा, पर्यावरण पुरक गणपती, विषमुक्त भाजीपाला, प्रेरणास्थळांची परिक्रमा आदी उपक्रम राबवण्यात आले. दशकपूर्ती निमित्त बसस्थानकाची आतून बाहेरून स्वच्छता करण्यात आली. यात शिर्डी नगरपरिषद, व्हीजन हाऊस कीपिंग, दीपक उत्तराधी यांची स्वच्छता टिम, बसस्थानकाचे अधिकारी बनकर व सचिन सोमवंशी यांनीही यात सहभाग घेतला. यावेळी साईसंस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी हजेरी लावली. त्यांनी ग्रीन एन क्लीनचे कौतूक केले. यावेळी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अजित पारख, सचिन तांबे, जितेंद्र शेळके, संजय शिरडीकर, नीलेश कोते, अ‍ॅड. अनिल शेजवळ आदींनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. सूत्रसंचालन मनिलाल पटेल यांनी केले. ताराचंद कोते यांनी आभार मानले. या अभियानाला शिर्डीकर नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला असून याचे कौतूक होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article