श्रीलंकेत प्रथमच 'डाव्या' पक्षाचे सरकार!,भारताची 'डोकेदुखी' वाढणार?

2 hours ago 2
पुढारी वृत्तसेवा

Published on

23 Sep 2024, 3:56 am

Updated on

23 Sep 2024, 3:56 am

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या श्रीलंकेमध्‍ये झालेल्‍या राष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुकीत ( Sri Lanka Presidential elections 2024) डाव्‍या पक्षाचे नेते अनुरा कुमारा दिसानायके ( Anura Kumara Dissanayake ) यांनी बाजी मारली आहे. श्रीलंकेत प्रथमच मार्क्सवादी नेता राष्ट्राध्यक्ष बनणार आहे. ( Sri Lanka’s new President) निवडणूक प्रचार काळात दिसनायके हे अदानी समूहाविरोधात सातत्‍याने विधाने करत होते. चीन समर्थक नेते, अशी ओळख असणार्‍या दिसानायके यांच्‍या विजयामुळे भारताच्‍या डोकेदुखीमध्‍ये वाढ होण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

कोण आहेत अनुरा कुमारा दिसानायके?

दिसानायके यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६८ रोजी मध्य श्रीलंकेतील गालेवेला येथील एका मध्‍यमवर्गीय कुटुंबात झाला. त्‍यांनी भौतिकशास्त्रात पदवी मिळवली. १९८७ मध्ये त्‍यांनी विद्यार्थी संघटनेमधून राजकारणात प्रवेश केला. यानंतर जनता विमुक्ती पेरामुना या मार्क्सवादी पक्षात त्‍यांनी प्रवेश केला. ९०च्‍या दशकात ग्रामीण आणि मध्यम वर्गातील तरुणांमधील असंतोषामुळे श्रीलंका सरकारविरोधातील सशस्त्र बंडाचे नेतृत्वही त्‍यांनी केले. १९९७ मध्‍ये जनता विमुक्ती पेरामुना पक्षाच्‍या केंद्रीय समितीवर त्‍यांची निवड झाली. २००८ मध्‍ये सशस्त्र संघर्षादरम्यान झालेल्‍या हिंसाचाराबाबत त्‍यांनी माफीही मागितली होती.

श्रीलंकेतील सामान्‍य जनतेच्‍या असंतोषाचे नायक

२०२२ मध्‍ये आर्थिक मंदीमुळे श्रीलंकेतील जनता रस्‍तावर उतरली. मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. तत्‍कालीन अध्‍यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना पदावरुन पायउतार व्‍हावे लागले. याच काळात श्रीलंकेतील सामान्‍य जनतेच्‍या असंतोषाला दिसानायके रुपाने नेतृत्त्‍व मिळाले . नॅशनल पीपल्स पॉवर (एनपीपी) आघाडीचे राष्‍ट्राध्‍यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या दिसानायके यांनी मागील काही वर्षांत भ्रष्टाचारविरोधी आणि गरीबांसाठीच्‍या कल्‍याणकारी योजनांची ग्‍वाही दिली आहे. यंदाच्‍या निवडणुकीत दिसानायके यांच्‍या जनता विमुक्ती पेरामुना पक्षाने नॅशनल पीपल्‍स पॉवर या पक्षाबरोबर युती केली. ५५ वर्षीय दिसानायके हे उत्‍कृष्‍ट वक्‍ता आहेत. यंदाच्‍या निवडणुकीत त्‍यांनी विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांचा पराभव केला तर रानिल विक्रमसिंघे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

दिसानायके भारताचे प्रकल्प बंद करणार?

चीनचे समर्थक मानले जाणार्‍या दिसानायके यांचा विजय भारताची चिंता वाढवणारा आहे. कारण मागील वर्षी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे भारतविरोधी मोहीम राबवूनच सत्तेवर आले हाेते. त्याचप्रमाणे अनुरा कुमारा हेही चीन समर्थक नेते आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान सत्तेत आल्‍यास भारतासोबत सुरू असलेले अनेक प्रकल्प थांबणार असल्‍याचा दावा केला होता. 'द हिंदू'च्या वृत्तानुसार, सोमवारी मतदानापूर्वी अनुरा कुमार यांनी भारतासोबतचे अनेक प्रकल्प बंद करणार असल्‍याचे म्‍हटले आहे. श्रीलंका हा नेहमीच भारताचा विश्वासू शेजारी देश राहिला आहे. आता सत्तांतरानंतर या देशाचे भारताबरोबरच्‍या धोरणात नेमका काय बदल होतो, याकडे भारतीय परराष्‍ट्र मंत्रालयाचे लक्ष असेणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article