'संगम नोज' काय आहे जिथे झाली चेंगराचेंगरी; महाकुंभात सर्वाधिक गर्दी तिथेच का होते?File Photo
Published on
:
29 Jan 2025, 5:22 am
Updated on
:
29 Jan 2025, 5:22 am
प्रयागराज : पुढारी ऑनलाईन
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात आज एक दुर्देवी घटना समोर आलेली आहे. आज मौनी अमावस्ये निमित्त पवित्र स्नानासाठी मोठ्या प्रमाणात भाविक नदी किनारी पाहोचले होते. रात्री उशीरा संगम नोज या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी झाली आणि झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास १० लोकांचा मृत्यू झालेत तर अनेक लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत एक प्रश्न समोर येतो की, हे संगम नोज काय आहे, ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याचे काय महत्व आहे.
संगम नोज हे या ठिकानाला नाव हे त्याच्या आकारावरून पडले आहे. प्रयागराज मध्ये संगम नोजला स्नानासाठी सर्वात योग्य जागा समजले जाते. असे मानले जाते की या ठिकाणीच यमुना आणि गुप्त सरस्वती गंगा नदीला मिळते. अधिकतर साधु, संत या ठिकाणीच स्नान करतात. अनेक भाविकही या ठिकाणीच स्नानासाठी अधिक महत्व देतात.
संगम नोजचे क्षेत्र हे प्रत्येक वेळी वाढवलेही जाते. २०१९ च्या तुलनेत या वेळी भाविकांची होणारी गर्दी पाहता संगम नोजचे क्षेत्र वाढवण्यात आले होते. माहितीनुसार, पहिल्यांदा इथे अशी व्यवस्था करण्यात आली होती की, प्रत्येक तासाला या ठिकाणी ५० हजार लोक स्नान करू शकतील. मात्र यावेळी महाकुंभात प्रत्येक तासाला २ लाखांहून अधिक लोक स्नान करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
'या' ठिकाणी पोहोचण्यासाठी लोकांची चेंगराचेंगरी
प्राथमिक समोर आलेल्या माहितीनुसार, सांगण्यात आले आहे की, मोठ्या संख्येने भाविक संगम नोज या ठिकाणी आले. ज्यामुळे या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. मात्र यावेळी प्रशासनाकडून अनेक रस्ते खुले करण्यात आले आणि गर्दीला मोकळी वाट करून देण्यात आली ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणामध्ये आलेली आहे.
मुख्यमंत्री योगींसह अनेक संतांनी संगम नोजवर जाण्यापासून लोकांना रोखले
चेंगराचेंगरीनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह साधु संतांनी भाविकांना संगम नोज या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच ज्या ठिकाणी असाल तिथेच स्नान करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून मेळाव्यात स्नानासाठी अनेक घाट बनवण्यात आले आहेत. मात्र अधिक गर्दी ही संगम नोजवर होते. त्यातच मौनी अमावस्येची गर्दी पाहून भाविकांना अन्य घाटांवर स्नान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री योगी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना आवाहन केले आहे की, जो भक्त ज्या गंगा घाटाच्या जवळ आहे, त्याच ठिकाणी त्यांनी स्नान करावे. संगम नोजवर जाण्याचा प्रयत्न करू नये. स्नानासाठी अनेक घाट बनवण्यात आले आहेत. कोणत्याही ठिकाणी स्नान करता येउ शकते. प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.