पौष अमावस्या म्हणजे मच्छिंद्रनाथ यात्रेचा मुख्य दिवस. वर्षभरात पौष अमावस्या, गुढी पाडवा समाधी उत्सव, मच्छिंद्रनाथ जन्मोत्सव, अमावस्या, पोर्णिमा या दिवसी मोठ्या संख्येने भाविक मायंबा येथे दर्शनासाठी येतात. बुधवारी पहाटे नाथांच्या महाआरतीनंतर यात्रेस प्रारंभ झाला. नाशिक, पुणे, औरांगाबाद, लोणावळा, बीड, आष्टी, गंगापूर, ठाणे या भागांतील भाविकांनी बुधवारी रात्रीच गर्दी केली होती. नगर, आष्टी, धामणगाव, पाथर्डी परिसरातील वाडया- वस्त्या, तांडे येथील पायी येणार्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. दुपारी आरतीनंतर सावरगाव ते मच्छिंद्रनाथ गड दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. गोशाळेच्या आवारात वाहने पार्किंगसाठी देवस्थान समितीकडून नियोजन करण्यात आले होते.
निवास व्यवस्था, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी भाविकांना पुरविण्यात आले. दुपारी देवतलाव येथून कोठी मिरवणूक वाजत-गाजत निघाली. नाथांचे अश्व, भगवे निशाण या मिरवणुकीत होते. गुलालाची उधळण, तोफांची सलामी व ढोल- ताशाचा निनादात कोठी मिरवणूक मंदिरस्थळी आली. यावेळी कोठी मिरवणुकीत मोठया संख्येने भाविक सहभागी झाले होते. शुद्ध तुपात तयार केलेले रोट भाविकांना वाटण्यात आले. नगर येथील नवनाथ भक्त मंडळाकडून मुख्य समाधी मंदिरात आकर्षक फुला-फळांची सजावट करण्यात आली होती.