Published on
:
30 Jan 2025, 5:21 pm
Updated on
:
30 Jan 2025, 5:21 pm
नागपूर : गुन्हा घडल्यानंतर त्याच्या फॉरेन्सिक परीक्षणासाठी बराच विलंब लागत होता. आता गुन्हा घडल्यानंतर तातडीने फॉरेन्सीक परीक्षण व्हावे, यासाठी गृह विभागाने राज्यभरात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर शहर पोलिस आयुक्तालयांतर्गतच्या पाचही पोलिस उपआयुक्त परिमंडळास या फॉरेन्सीक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सायबर गुन्हे किंवा विस्फोटक पदार्थासंबंधी गुन्हे घडल्यावर त्याचे तात्काळ परीक्षण शक्य होणार आहे.
पोलिस आयुक्तालयाला प्राप्त झालेल्या ५ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन या आज गुरुवारी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र्कुमार सिंगल यांच्या हस्ते पाचही परीमंडळीय पोलिस उपायुक्तांना सुपुर्द करण्यात आल्या. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वीत करण्याकरीता प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नागपूर येथील उपसंचालक समन्वयक डॉ. विजय ठाकरे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. १६ किट असून प्रत्येक मोबाईल व्हॅनमध्ये त्या समाविष्ट करून कार्यान्वीत केल्या आहेत. प्रत्येक व्हॅन ही वातानुकुलीत आहे. त्यामध्ये संगणक तसेच प्रिंटर्स, फ्रिज आणि वेळीच केमीकल अॅनालीसीस करण्याकरीता त्याचप्रमाणे सायबर गुन्हे किंवा विस्फोटक पदार्थासंबंधी गुन्हे घडल्यास त्यावर तत्काळ परीक्षण करण्यासाठी संपुर्ण सामुग्री उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनामध्ये अत्याधुनिक कॅमेरा लावण्यात आलेला आहे. प्रत्येक व्हॅनमध्ये १ फॉरेन्सिक लॅबोरेटरी अधिकारी, सहायक तथा अटेंडंट, पोलिस कर्मचारी आणि वाहन चालक उपलब्ध राहणार आहेत.
फॉरेन्सिक तज्ज्ञ हे घटनास्थळाहुन गोळा केलेले नमुने संबंधीत तपासी अधिकारी यांना क्राईम-सिन रिपोर्टसह तयार करून देणार आहेत. या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन हस्तांतरण कार्यक्रमाला पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर, श्वेता खेडकर, लोहीत मतानी, राहुल मदने, अर्चित चांडक, महेक स्वामी, रश्मीता राव, अश्वीनी पाटील तसेच प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नागपूरचे उपसंचालक डॉ. विजय ठाकरे. डॉ. सुनिता पाटील, पोलिस अधिकारी व अंमलदार प्रामुख्याने उपस्थित होते.