संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या बंगल्या बाहेर समर्थकांनी दुसर्या दिवशीही ठिय्या मारत संताप व्यक्त केला.Pudhari File Photo
Published on
:
07 Feb 2025, 1:42 am
फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या निवासस्थानी दि. 5 फेब्रुवारी सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाची सुरु झालेली तपासणी तब्बल 36 तास उलटून गेले तरी सुरूच होती. अधिकार्यांकडून चौकशी करण्याचे काम सुरूच असून छापा का पडलाय? याचे नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही. बंगल्यात तपास यंत्रणेच्या अधिकार्यांकडून कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. तर बाहेर राजे समर्थक प्रवेशद्वारावरच ठाण मांडून बसले आहेत.
संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या निवासस्थानावर केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी बुधवारपासून सखोल चौकशी करत आहेत. संजीवराजे यांचे पुत्र सत्यजितराजे परगावी होते. ते गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता फलटण येथे पोहोचले. त्यानंतर तपास यंत्रणांनी त्यांचीही चौकशी केल्याचे समजते. आतमध्ये तपास यंत्रणांकडून नेमकी कशाची तपासणी चालू आहे? तपासणीत काय सापडले? तपासणीमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले? कोण कोणती कागदपत्रे मागितली? याबद्दल बाहेर काहीच माहिती समजू शकलेली नाही. मात्र तपास यंत्रणेच्या हाती काहीच लागले नसल्याची चर्चा सुरू आहे. सुरुवातीपासूनच संजीवराजे ना. निंबाळकर यांचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध आहे. स्वतः संजीवराजे, त्यांचे कुटुंबीय तसेच अन्य संबंधित व्यक्तीही तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत आहेत. दुपारी तीननंतर संजीवराजे व सत्यजितराजे यांनी बंगल्याच्या आतूनच कार्यकर्त्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही. गर्दी करू नका. सर्व काही ठीक आहे, असे सांगून शांत राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान, संजीवराजे यांची आयकर विभागाकडून होत असलेल्या तपासणीबद्दल त्यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवून संजीवराजे ना. निंबाळकर यांना समर्थन असल्याचे व्यक्त केले.
इट्स राँग नंबर काळजी करू नका : रघुनाथराजे
संजीवराजे ना. निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे ना. निंबाळकर यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, काळजी करण्याचं काही कारण नाही. जनतेने निश्चिंत रहावे. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. अधिकार्यांनी सर्व चौकशी करावी. प्रत्येक गोष्टीचा हिशोब दिला जातोय. जे झालं ते बरं झालं. ‘साप साप म्हणून भुई धोपटायचं’ तरी बंद होईल. तपास यंत्रणेचे अधिकारी व्यवस्थितपणे रेकॉर्डची तपासणी करत आहेत. अधिकार्यांच्याही लक्षात आलेलं आहे की हे दोन नंबरचं घरच नाही. संजीवराजे यांच्या जवळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. उत्पन्नाचे स्तोत्र बरोबर आहेत. इन्कम टॅक्स योग्य पद्धतीने भरला गेला आहे. कोणतीही चुकीची गोष्ट नाही. समर्थकांना काळजी वाटते, परंतु काळजी करण्यासारखं काहीच नाही. फलटण म्हणजे बिहार नाही. मालोजीराजे यांच्या काळापासून सर्व व्यवस्थितपणे सुरू आहे. समाजकारणाचा आम्हाला वारसा लाभला आहे. पैशाचे ढीगच्या ढीग सापडतील असं कोणाला वाटलं असेल पण तसं काहीच नाही. इथे रुपया रुपयाचा हिशोब आहे. काहीच सापडत नाही. ‘इट्स राँग नंबर’ जनतेने अजिबात काळजी करू नये, असेही ते म्हणाले.