Published on
:
22 Nov 2024, 12:31 am
Updated on
:
22 Nov 2024, 12:31 am
सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात सरासरी 72.12 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
जिल्ह्यातील आठ मतदारसंघात बुधवार, दि. 20 नोव्हेंबररोजी मतदान झाले. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीतील हे सर्वाधिक मतदान ठरले आहे. सांगली जिल्ह्याने मतदानात राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. सांगलीच्या पुढे कोल्हापूर, जालना आणि गडचिरोली, जिल्ह्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी अशी आहे. मिरज : 66.07 टक्के, सांगली : 62.78, इस्लामपूर : 74.71, शिराळा : 78.57, पलूस-कडेगाव : 79.02, खानापूर : 71.27, तासगाव-कवठेमहांकाळ : 74.99 व जत : 72.38 टक्के असे मतदान झाले.
आतापर्यंत चौदा विधानसभा निवडणुका झाल्या असून, यामध्ये सांगली जिल्ह्यात झालेले 72.12 टक्के मतदान हे सर्वाधिक ठरले आहे. सांगली जिल्ह्यात 2014 मध्ये 71.57 टक्के, तर 2019 मध्ये 67.39 टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक 79.02 टक्के मतदान पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात झाले असून सर्वात कमी 62.78 टक्के मतदान सांगली विधानसभा मतदारसंघात झाले आहे. मतमोजणी उद्या, शनिवार, दि. 23 नोव्हेंबररोजी होणार आहे. यासाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात उद्या- शनिवार, 23 नोव्हेंबररोजी आठ ठिकाणी मतमोजणी होणार असून, यासाठी जवळपास दोन हजार कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणीची प्रशासनाकडून जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी गुरुवारी संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला.
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात 25 लाख 36 हजार मतदारांपैकी 18 लाख 28 हजार 984 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 72.12 टक्के मतदान झाले आहे. आठही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबररोजी त्या त्या मतदारसंघातील मुख्यालयाच्या ठिकाणी होणार आहे. यासाठीची सर्व तयारी प्रशासनाकडून केली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे.