Published on
:
22 Nov 2024, 1:10 am
Updated on
:
22 Nov 2024, 1:10 am
कुडाळ : तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण तीन विधानसभेचे मतदारसंघ आहेत. त्यात तीनपैकी कुडाळमध्ये नीलेश राणे व सावंतवाडीमध्ये आ.दीपक केसरकर हे शिंदे शिवसेनेचे उमेदवार ठाकरे शिवसेने विरोधात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्याने दोन्ही मतदारसंघांत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी बिग फाईट झाली. आता 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर शिंदे शिवसेनेची जिल्ह्यात ताकद किती? याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ व कणकवली असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. सन 2014 व त्यानंतर सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातून आ.दीपक केसरकर व कुडाळ मतदारसंघात आ.वैभव नाईक यांच्या रूपाने तत्कालीन एकसंध शिवसेनेने जिंकले होते, तर कणकवली विधानसभा मतदारसंघ नीतेश राणे यांच्या रूपाने 2014 मध्ये काँग्रेस तर 2019 मध्ये भाजपकडे राहिला होता. मात्र अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली, त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली. शिवसेना फुटीनंतर काही काळाने राष्ट्रवादीसुद्धा दुभंगली गेली. त्यामुळे राज्याच्या राजकारणासह जिल्ह्याच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले.(Maharashtra assembly polls)
शिवसेना फुटीनंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर हे शिंदे शिवसेनेत गेले व शालेय शिक्षणमंत्री झाले. मात्र कुडाळ मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे ठाकरेंशी निष्ठेने राहिले. या राजकीय उलथापालथीनंतर लोकसभेची निवडणूक झाली. त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ विनायक राऊत यांच्या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून हातचा गेला. या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत हे पिछाडीवर गेले तर महायुतीचे उमेदवार खा. नारायण राणे यांना तब्बल एक लाखाच्यावर मताधिक्य मिळाले.
त्याला आता सहा महिन्यांचा अवधी निघून गेला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या वार्यात एकेकाळी शिवसेनेचे ढाण्या वाघ म्हणून ओळख असलेले खा. नारायण राणे यांचे पुत्र व भाजपाचे कुडाळ विधानसभा प्रचार प्रमुख नीलेश राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत कुडाळ मतदारसंघाची उमेदवारी पटकावली. त्यानंतर नारायण राणे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले दत्ता सामंत यांचासुध्दा मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला. त्यांची तत्काळ शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. तर सावंतवाडी मतदारसंघातील भाजपचे एक प्रभावी नेतृत्व माजी नगराध्यक्ष संजू परब यांनाही शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या गळ्यात जिल्हा संघटक पदाची माळ घालण्यात आली.(Maharashtra assembly polls)
जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारताच दत्ता सामंत यांनी कुडाळ-मालवण तालुक्यातील ठाकरे सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, सारपंच. ग्रा. पं. सदस्य यांचे शिंदे शिवसेनेत प्रवेश घडवले. अश्या प्रकारे कुडाळ मतदारसंघात शिंदे शिवसेनेची ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे. मात्र हे चित्र खरे की केवह आभास आहे, याचा पर्दापाश उद्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान काल झालेल्या मतदानात कुडाळ मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढला आहे. आता हा वाढलेल्या मतांचा टक्का कुणाला धक्का देतो? कुणाला तारतो? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.