Published on
:
22 Nov 2024, 7:52 am
Updated on
:
22 Nov 2024, 7:52 am
राहुरी शहरात भरवस्तीमध्ये असलेल्या जंगम गल्लीत दोन अज्ञात भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबडून मोटारसायकलवर धुम ठोकली. या घटनेत महिला किरकोळ जखमी झाली. ही घटना रात्रीच्या दरम्यान घडली.
आशा नंदकुमार जंगम व त्यांची मुलगी अशा दोघी बुधवारी रात्री 8.30 वाजे दरम्यान शहरातील जंगम गल्ली येथील रमेश लुक्कड यांच्या लुक्कड किराणा स्टोअर येथे किराणा सामान घेत होत्या. त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दोन भामट्यांपैकी एकाने आशा जंगम यांच्या मागे जाऊन त्यांच्या गळ्यातील दिड तोळा वजनाचे मिनीगंठन ओरबडले. त्यावेळी आशा जंगम यांच्या गळ्याला जोराचा हिसका बसल्याने त्या रस्त्यावर कोसळल्या. त्यांच्या डोक्याला मार लागला. यावेळी त्यांच्या मुलीने त्या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने बाजूला उभा असलेल्या सोबतीच्या चोराच्या दुचाकीवर बसून धूम ठोकली.
या घटनेवेळी तेथे काही छोटी मुले खेळत होते. त्यांनी ही घटना प्रत्यक्षात पाहिली. नंतर पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन ताजणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. यावेळी परिसरातील राजेंद्र दरक, राजेंद्र सुराणा, स्वप्नील भालेकर, नानासाहेब शिंदे, फारुख शेख, तेजस लुक्कड, जमिर आतार, उमेश लोखंडे, अमित साळवे आदी उपस्थित होते. भर वस्तीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भामट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे.