दहावीचा निरोप समारंभ असल्याने सर्व विद्यार्थी रंगीबेरंगी कपडे घालून आले होते. वर्गातील बाकावर बसून मुला-मुलींच्या गप्पा रंगल्या होत्या. आता आपण कॉलेजला जाणार याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अचानक मोठा आवाज झाला आणि विद्यार्थ्यांचा एकच थरकाप उडाला. कारण शिक्षक संजय लोहार हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खाली कोसळले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लोहार हे विद्यार्थ्यांना निरोप देत असतानाच अचानक त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ही हृदयद्रावक घटना मनोरच्या शाळेत मंगळवारी घडली.
पालघर तालुक्यातील मनोर येथे लालबहादूर शास्त्री हायस्कूल आहे. या शाळेत दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. शाळेच्या एका सभागृहात निरोप समारंभ कार्यक्रम सुरू होता. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. शिक्षक संजय लोहार हेदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. लोहार हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोडियमजवळ आले.
ही दुर्दैवी घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. हृदयविकाराचा झटका आल्याने संजय लोहार यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
• दहावीनंतर काय करावे, कोणता मार्ग निवडावा याविषयी मार्गदर्शन करत असताना लोहार पोडियमसह अचानक खाली कोसळले.
• क्षणाचाही विलंब न करता अन्य शिक्षकांनी लोहार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांना त्यांना तपासून मृत घोषित केले.
तो हुंदका शेवटचा ठरला
सध्या महाविद्यालयांमध्ये निरोप समारंभाचे वारे वाहत आहेत. अशातच निरोप समारंभात भाषण करत असताना शिक्षक लोहार यांना गहिवरून आले. दाटून आलेला तो हुंदका त्यांच्यासाठी शेवटचा ठरला. बोलता बोलता ते अचानक थांबले. भारावलेल्या वातावरणात सर्वजण या वेळी हळवे झाले होते.
संजय सर हे सुस्वभावी असून ते अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्त्व होते. इतिहास विषयाचे ते प्रशिक्षक होते. खडतर परिस्थितीवर मात करून ते पुढे आले होते. सर्व सहकाऱ्यांशी ते आदराने वागायचे. विद्यार्थी तसेच शिक्षकांचेही ते फेवरेट होते.
प्रसाद चंपानेरकर, शिक्षक