नातेपुते: माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर फेर मतदान घेणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने रोखले होते. त्यानंतर मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या सुमारे २०० ग्रामस्थांच्या विरोधात नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.
संजय हरिभाऊ वाघमोडे, राजेद्र अंकुश मारकड, वैभव वाघमोडे, विजय वाघमोडे, विलास आद्रट, रणजित जिजाबा मारकड, लक्ष्मण सिताराम मारकड, सर्जेराव बाबुराव लोखंडे, संदिपान आण्णा मारकड, अमित वाघमोडे, दत्तु राघु दडस, आबा नाना मारकड, बबन दादा वाघमोडे, मारुती शंकर रणदिवे, नानासाहेब मारकड, संजय नरळे, शरद कोडलकर (सर्व रा. मारकडवाडी) यांच्यासह १०० ते २०० ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करून भीती निर्माण करत समाजात द्वेषाची भावना निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. माळशिरसच्या नातेपुते पोलीस ठाण्यात जमावबंदी आदेशानंतर कलम १६३ व १४४ प्रमाणे आदेश बाधीत केल्या प्रकरणी आणखी काही जणांवर गुन्हे दाखल करण्याचे काम चालू आहे.