हमास-इस्रायल युद्धविराम आणि भारत

1 day ago 3

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

इस्रायल-हमास युद्धबंदीमुळे अनेक महिन्यांच्या विलंबानंतर जागतिक सहकार्य वाढविण्यासाठी भारताचे दरवाजे उघडले आहेत. हौथी दहशतवाद्यांमुळे भारताच्या जहाजांना रेड सी आणि सुएझ कॅनॉलऐवजी केप ऑफ गुड होपला वळसा मारून जावे लागायचे, त्यामुळे व्यापाराचा खर्च हा 30 ते 40 टक्के वाढला होता. तो आता कमी होईल .दुसरे इस्रायलशी आपला दोन अब्ज डॉलरएवढा व्यापार आहे, तो आता पुन्हा एकदा सुरू होईल.

इस्रायल आणि हमास या पॅलेस्टिनी संघटनेदरम्यान 15 महिन्यांच्या संघर्षानंतर युद्धविरामावर मतैक्य झाले आहे. 19 जानेवारीपासून 42 दिवसांचा युद्धविराम सुरू झाला आणि यात इस्रायली ओलिसांच्या सुटकेवर भर दिला जाईल, पण हा युद्धविराम म्हणजे युद्धबंदी नाही आणि ‘संपूर्ण विजया’चे उद्दिष्ट कायम असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. त्यामुळे किती काळ युद्धविराम राहील याविषयी शंका आहे.

निरपराध ओलीस आणि पॅलेस्टिनींची सुटका झाल्यानंतर सीमेच्या दोन्ही बाजूंना सामान्य इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिकांनी 20जानेवारीला जल्लोष केला. हमास आणि इस्रायलदरम्यान रविवारपासून युद्धविराम लागू झाल्यानंतर हमासच्या ताब्यातील तीन इस्रायली ओलीस आणि इस्रायलच्या कैदेतील 90 पॅलेस्टिनी नागरिक आपापल्या कुटुंबांकडे परतले. 15 महिने युद्ध सुरू असताना अखेर हमासने एमिली दमारी, रोमी गोनेन आणि डोरोन स्टाइनब्रेशर या तीन ओलिसांना ‘रेड क्रॉस’कडे सोपवले. तिथून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे नेण्यात आले.

ओलीस व कैदी आपापल्या नातेवाईकांची भेट घेत असताना भावुक वातावरण होते. दरम्यान, इस्रायलचे निर्बंध उठल्यानंतर मानवतावादी मदत घेऊन येणारे 600 ट्रक उद्ध्वस्त गाझामध्ये दाखल झाले असून आणखी मदत पुरवठा केला जाईल.

हमासच्या आधी इस्रायलने गेल्या नोव्हेंबरमध्ये हेझबोलाबरोबर युद्धविराम घडवून आणला होता. हेझबोलाने हमासला समर्थन देण्यासाठी इस्रायलवर रॉकेट वर्षाव केला होता. मग हमासशी लढत असताना इस्रायलने हेझबोलाविरुद्ध स्वतंत्र मोहीम उघडली. हसन नसरल्लासारखे त्या संघटनेचे नेते वेचून मारले. नंतर इराणवरही दूर पल्ल्याचे हल्ले करून इस्रायलने मोठा विजय मिळवला. मधल्या काळात सीरियात उठाव झाला. तिथे इराणचा पराभव झाला. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम न केल्यास आम्ही तुम्हाला पूर्ण नष्ट करू असा दम हमासला दिला.

सगळे मदतगार हरल्यामुळे हमासला युद्धविरामाशिवाय गत्यंतर नव्हते. इजिप्त आणि कतार या अरब देशांनी हमासच्या नेतृत्वावर दबाव आणला, तर दुसरीकडे हमासच्या ताब्यातील उरलेसुरले इस्रायली ओलीस सुखरूप मायदेशी परतावेत यासाठी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंवर दबाव वाढत होता. या दोन घटकांमुळे युद्धविरामाच्या वाटाघाटींना यश आले.

हमासचे नेते जे प्रमुख नेते वाटाघाटींमध्ये सहभागी आहेत ते गाझाबाहेरील आहेत. गाझामधील हमासचे नेतृत्व मोहम्मद शिनवारकडे आहे. हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा सूत्रधार याह्या शिनवार याचा हा धाकटा भाऊ आहे. इस्रायली ओलीस त्याच्याच ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेचे श्रेय घ्यायचे असल्यामुळे आणि सर्व ओलिसांची सुटका झाल्यास आपल्या जिवालाही धोका निर्माण होईल अशी भीती वाटल्यामुळे मोहम्मद शिनवारकडून युद्धविरामाच्या अंमलबजावणीबाबत चालढकल होऊ शकते. तिकडे इस्रायली मंत्रिमंडळ आणि सरकारमध्येही काही कडव्या उजव्या पक्षांना हमासचा पूर्ण निःपात झाल्याशिवाय इस्रायलने शस्त्र्ाsच खाली ठेवू नयेत असे वाटते. दोन्हीकडील कडव्यांच्या कात्रीत युद्धविरामाची प्रगती सापडण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेचे श्रेय स्वतःकडे घेतले, आहे. आपण सत्तेत आल्यानंतर सर्वच युद्धांचा शेवट घडवून आणणार असे ते प्रचारात सांगत होते. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन यांच्यापेक्षा इस्रायलच्या पंतप्रधानांना ट्रम्प यांच्याविषयी अधिक आत्मीयता आहे. कारण गेल्या वर्षी मे महिन्यात बायडेन प्रशासनाने बनवलेल्या प्रस्तावालाच सुधारित स्वरूपात सादर करून नवीन प्रस्ताव बनवण्यात आला. शिवाय इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यात करार घडवून आणण्याचाही त्यांचा प्रयत्न होता, पण ट्रम्प यांनी केलेल्या दमदाटीचा पण परिणाम झाला असावा.

इस्रायल आणि सौदी अरेबिया हे दोन्ही इराणचे शत्रू आहेत. या दोन्ही देशांदरम्यान अधिकृत राजनैतिक संबंध नाहीत. अरब-इस्रायली युद्धकाळातील कडवटपणा कमी झाला असला तरी पॅलेस्टिनींच्या मुद्दय़ावर आजही सौदी इस्रायलवर टीका करतात, पण सौदीबरोबर कराराविषयी नेतान्याहू अनुपूल आहेत. भविष्यात यानिमित्त पॅलेस्टिनींना त्यांच्या हक्काचे राष्ट्र मिळत असेल तर इस्रायलबरोबर असा करार करण्याची सौदी अरेबियाचीही तयारी आहे. याविषयी वाटाघाटींना बायडेन प्रशासनाच्या काळात सुरुवात झाली. त्यांची यशस्वी परिणती ट्रम्प काळात होऊ शकते.

भारत-मध्यपूर्व-युरोप काॅरिडॉर (IMEC) पुढे जाण्याची संधी देणाऱया इस्रायल-हमास युद्धबंदीचे भारताने स्वागत केले आहे. अनेक महिन्यांच्या विलंबानंतर जागतिक सहकार्य वाढविण्यासाठी दरवाजे उघडले आहेत. इस्रायल-हमास युद्धविरामामुळे या भागात शांतता निर्माण होण्याची शक्यता वाढली झाली आहे. त्यामुळे भारताचे अनेक फायदे होतील. हौथी दहशतवादी लाल समुद्र/ रेड सीमध्ये क्षेपणास्त्रे फायर करत होते. त्यामुळे भारताच्या जहाजांना रेड सी आणि सुएझ पॅनॉलचा वापर करता येत नव्हता. त्यांना केप ऑफ गुड होपला वळसा मारून जावे लागायचे, ज्यामुळे युरोप आणि अमेरिकेकडे होणाऱया व्यापाराचा खर्च हा 30 ते 40 टक्के वाढला होता. तो आता कमी होईल .दुसरे इस्रायलशी आपला दोन अब्ज डॉलरएवढा व्यापार आहे, तो आता पुन्हा एकदा सुरू होईल. याशिवाय इस्रायलमध्ये पुनर्निर्माण म्हणजे रीकन्स्ट्रक्शन करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याचा फायदा भारतीय कंपन्यांना मिळेल. याआधी पण इस्रायलने अनेक भारतीयांना इस्रायलमध्ये काम करण्याकरिता बोलावले होते. त्यामुळे इथे नोकरीची निर्मितीसुद्धा होण्याची शक्यता वाढलेली आहे. या युद्धविरामामुळे कच्च्या तेलाचे भाव कमी होतील, ज्यामुळे भारताची इंधन सुरक्षा मजबूत होण्यामध्ये मदत मिळेल. म्हणजेच या युद्धविरामाचा भारताला मोठाच फायदा होणार आहे, ज्याचा पुरेपूर फायदा आपण इस्रायलशी व्यापार वाढवून उठवला पाहिजे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article