‘हा’ आहे जगातील सर्वात मोठा खेकडा.Pudhari File Photo
Published on
:
14 Nov 2024, 11:39 pm
Updated on
:
14 Nov 2024, 11:39 pm
टोकियो : जगभरातील सी-फूड खवय्यांच्या आहारात खेकडा असतो. खेकड्यांचेही अनेक प्रकार पाहायला मिळत असतात. मात्र, जगातील सर्वात मोठा खेकडा कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का? या खेकड्याचे नाव आहे ‘जापनीज स्पायडर क्रॅब’. नावावरूनच तुमच्या लक्षात आले असेल की हे खेकडे जपानमध्ये मोठ्या संख्येने आढळतात.
या खेकड्यांचा आकार एखाद्या कोळ्यासारखा असतो. त्यामुळेच त्याला ‘स्पायडर खेकडा’ म्हटले जाते. त्यांची रुंदी तब्बल 30 सेंटिमीटर म्हणजेच 12 इंच असते. त्याचे पाय एका पंज्यापासून दुसर्या पंज्यापर्यंत बारा फूटांपर्यंत फैलावू शकतात. विशेष म्हणजे अशा खेकड्यांचे वजन 20 किलोही असू शकते. हा खेकडा दीर्घायुष्यीही असतो. ते शंभर वर्षे जगू शकतात. त्यांचे वैज्ञानिक नाव ‘मॅक्रोचेईरा कॅम्फेरी’ असे आहे. ही सागरी खेकड्यांची एक प्रजाती आहे. जपानमध्ये त्यांना ‘ताका-अशा-गानी’ असे म्हटले जाते. त्याचा अर्थ ‘उंच पायांचे खेकडे’ असा होतो. जपानमध्ये हे खेकडे खवय्यांमध्ये लोकप्रिय आहेत. युरोपियन स्पायडर क्रॅबही आकाराने कोळ्यासारखेच दिसत असले तरी ते लहान आकाराचे असतात. त्यांचे रुपडे जपानी खेकड्यांसारखेच असते. हे जपानी खेकडे होंशु या बेटालगतच्या समुद्रात आढळतात.