Published on
:
30 Sep 2024, 4:00 pm
Updated on
:
30 Sep 2024, 4:00 pm
निपाणी: कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी (ता.निपाणी) येथील हालसिध्दनाथ देवाची (भोंब) पौर्णिमेला साजरी होणारी पाचदिवसीय यात्रा १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यात्रेनिमित्त दि. १८ ते २२ ऑक्टोंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१८ ऑक्टोंबरला सकाळी श्रींची पालखी, सबिना सोहळा, रात्री ढोल जागर, ऑक्टोंबरला रात्री ढोलजागर, श्रींची पालखी प्रदक्षिणा, २० ऑक्टोंबरला रात्री श्रींची पालखी सबिना प्रदक्षिणा, उत्तर रात्री नाथांची पहिली भाकणूक होणार असून २१ ऑक्टोंबरला यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी दिवसभर महानैवेद्य रात्री श्रींची पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर उत्तर रात्री मुख्य दुसरी भाकणूक होणार आहे. २२ ऑक्टोंबरला सकाळी ७ वाजता घुमटातील मंदिरात भाकणूक झाल्यानंतर सायंकाळी ४ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा होऊन यात्रेची सांगता होणार आहे.
विशेष म्हणजे दरवर्षी भरणाऱ्या या नाथांच्या भोंब पौर्णिमेच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी असते. नाथांचे भक्त भगवान डोणे व त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ डोणे (वाघापूरकर) यांची भाकणूक होते. या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील लाखो भाविक हजेरी लावतात. यात्रेनिमित्त पूर्वतयारी सुरू असल्याची माहिती आप्पाचीवाडी ग्रा.प.सदस्य व यात्रा कमिटी अध्यक्ष कृष्णात पोटले व ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आली. यात्राकाळात पाच दिवस शाळा आवारात हालसिध्दनाथ सेवा संस्थेतर्फे भाविकांसाठी मोफत अन्नदानाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
यात्रेसाठी जादा बसेसची व्यवस्था
यात्रेत येणाऱ्या विविध दुकानांसाठी जागा देण्याचे काम १३ ऑक्टोंबरला सकाळी १०.३० ते ५ या वेळेत होणार आहे. यात्राकाळात सौंदलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे मोफत आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. भाविकांसाठी कोल्हापूर,कागल, निपाणी, चिकोडी रायबाग, गारगोटी व संकेश्वर येथून जादा बसेसची सोय केली आहे.