हिंगोली जिल्ह्यात पटसंख्या कमी असलेल्या शाळेत शिक्षकांची मोठी गर्दी:38 शाळेत नियुक्तीसाठी एक हजारावर अर्ज

4 days ago 3
हिंगोली जिल्हयात १० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३८ शाळांमधून कंत्राटी शिक्षकाच्या पदासाठी तब्बल १ हजारावर अर्ज प्राप्त झाले असून मंगळवारी ता. १५ अर्ज घेण्याचा अखेरचा दिवस आहे. शासनाने १० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या एक शिक्षकी शाळेवर एक डीएड, किंवा बीएड कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी शिक्षकाला १५००० रुपये मानधन दिले जाणार असून पद भरती होईपर्यंत या कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती असणार आहे. त्यानुसार या पदासाठी डीएड, बीएड झालेल्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. दरम्यान, हिंगोली जिल्हयात १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या सुमारे ३८ एवढी असून या शाळांवर कंत्राटी शिक्षकाचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज दाखल करण्यास आज सकाळपासूनच जिल्हा परिषदेमध्ये मोठी गर्दी झाली होती. शिक्षण विभागात सुरवातीला एकाच टेबलवर अर्ज घेतले जात होते. मात्र हळूहळू गर्दी वाढत गेल्याने गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी चार टेबलवर अर्ज घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार चार टेबलवर अर्ज घेतले जात असतांनाही भावी कंत्राटी शिक्षकांच्या रांगा कायम होत्या. हिंगोली जिल्हा परिषदेत सायंकाळी उशीरा पर्यंत तब्बल १ हजार पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आता मंगळवारी ता. १५ अर्ज घेतले जाणार असून सुमारे ३८ जागांसाठी तब्बल १५०० पेक्षा अधिक अर्ज येतील असा अंदाज शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. गावातील उमेदवाराला प्राधान्य शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के म्हणाले, शाळांवर कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करतांना गावातील उमेदवाराला प्राधान्य दिले जाणार आहे. एखाद्या गावात एकच विद्यार्थी डीएड किंवा बीएड असेल तर त्यांना तातडीने नियुक्ती दिली जाईल. मात्र एका पेक्षा अधिक असतील तर गुणवत्तेनुसार नियुक्ती दिली जाणार आहे. या शिवाय एखाद्या गावात एकाही उमेदवार डीएड किंवा बीएड नसेल तर त्या ठिकाणी तालुकास्तरीय गुणवत्तेनुसार नियुक्ती दिली जाणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article