हिंगोली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी 71.10 टक्के:मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
2 hours ago
1
हिंगोली जिल्हा प्रशासनाने यावेळी विधानसभा निवडणुकीत मतदानाचे ठेवलेले 70 टक्याचे उदिष्ट साध्य करून दाखविले असून यावेळी 71.10 टक्के मतदान झाले आहे. मराठवाड्यात हिंगोली जिल्हयाने दुसरा क्रमांक मिळविला आहे. आता मजमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, वसमत विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत 69.68 टक्के मतदान झाले होते. यावेळी 70 टक्के पेक्षा अधिक मतदान व्हावे यासाठी प्रशासकिय पातळीवरून प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी वेळोवेळी बैठकांतून 70 टक्के मतदानाचे उदिष्ट गाठण्यासाठी बैठकांतून आवश्यक सुचना दिल्या होत्या. त्यानुसार वसमतमध्ये उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी, कळमनुरीत उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जीवककुमार कांबळे, हिंगोलीत उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी गाव पातळीवर मतदान जनजागृतीचे नियोजन केले होते. त्यानुसार जिल्हयातील प्रत्येक गावांतून आठवडी बाजार, सार्वजनिक ठिकाणे तसेच गर्दीच्या ठिकाणी स्वीप समितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, प्रशांत डिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीने 42 गावांमधून डोअर टू डोअर जाऊन मतदान जनजागृती केली. या गावांमध्ये लोकसभा निवडणुकीत 50 टक्के पेक्षा कमी मतदान झाल्यामुळे या गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. दरम्यान, प्रशासनाने 85 वर्षावरील वयोगटातील मतदारांचे गृहमतदान करून घेतले. या शिवाय दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर, मतदान केंद्रावर रॅम्प उभारणी करून त्यांच्या मदतीसाठी कर्मचारी देखील नियुक्त केले होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी उदिष्टापेक्षा जास्त झाली असून जिल्हयातील तीनही विधानसभा मतदार संघात 71.10 टक्के मतदान झाले आहे. आता प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी सुरु झाली असून टपाली मतदान मोजणीसाठी सहाय्यक मतमोजणी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात झालेले मतदान छत्रपती संभाजीनगर 68.89 टक्के, बीड 67.79 टक्के, हिंगोली 71.10 टक्के, जालना 72.30 टक्के, लातुर 66.92 टक्के, नांदेड 64.92 टक्के, धाराशिव 64.27 टक्के, परभणी 70.28 टक्के मतदान झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)