हिंगोलीत खंजरचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न:झटापटीत एक मुलगा जखमी, उपचारासाठी लक्ष्मी लाईफ केअर रुग्णालयात दाखल
5 hours ago
1
हिंगोली शहरातील तिरुपतीनगर भागात गुरुवारी ता. २१ दुपारी एका घरात शिरलेल्या चोरट्याने खंजरचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी मुलगा घरात आल्याने त्याची चोरट्यांसोबत झटापट झाली. त्यानंतर चोरटे दुचाकीवर पळून गेले. यावेळी झटापटीत मुलाच्या मानेवर खंजर लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी लक्ष्मी लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तिरुपती नगर भागात सुरेंद्र सावंत यांचे घर आहे. आज दुपारच्या सुमारास सावंत हे पेट्रोलपंपावर गेले होते तर त्यांच्या पत्नी व मुले घरी होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर दोन चोरटे आले. दोघेही काही वेळ घराच्या भिंतीजवळ घुटमळले. त्यानंतर त्यांनी घराची बेल वाजवली. त्यामुळे सावंत यांच्या पत्नीने दरवाजा उघडताच एका चोरट्याने खंजर काढून त्यांना दाखविला. या प्रकारामुळे त्या घाबरून गेल्या. दरम्यान, याचवेळी त्यांचा मुलगा श्रेयस सावंत घरी आला. त्याला घरात चोरटा शिरल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने चोरट्याशी झटापट सुरु केली. यामध्ये चोरट्याने त्याच्या मानेवर खंजरने वार केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. या झटापटी नंतर चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला. त्यानंतर सावंत कुटुंबियांनी जखमी श्रेयस यास उपचारासाठी लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पीटलमध्ये दाखल केले. त्या ठिकाणी डॉ. अखील अग्रवाल यांच्या पथकाने त्याच्यावर उपचार सुरु केले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक परगेवार, जमादार अशोक धामणे, संतोष करे, संभाजी लकुळे, धनंजय क्षिरसागर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याप्रकरणी रात्री उशीरा पर्यंत हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)