Published on
:
24 Nov 2024, 1:03 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:03 am
कोल्हापूर : कागलच्या राजकीय विद्यापीठावरील हसन मुश्रीफ यांची बैठक सैल करण्यात राजकारणात वस्ताद समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली खरी; पण राजकारणातल्या हिंदकेसरीने वस्तादांनाच राजकीय आखाड्यात आस्मान दाखविले. 1999 पासून सलगपणे हसन मुश्रीफ विजयी झाले आहेत. या निवडणुकीत त्यांनी शाहू सहकार समूहाचे प्रमुख समरजित घाटगे यांना दुसर्यांदा पराभूत केले आहे. यामुळे कागलच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. घाटगे यांना गटाची फेरबांधणी करावी लागणार आहे.
1999 साली राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले गेले आहेत. तेव्हापासून मुश्रीफ सातत्याने निवडून येत आहेत. ज्या ज्यावेळी आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले, त्या प्रत्येकवेळी मुश्रीफ यांना पक्षाने मंत्रिपद दिले. याचा फायदा त्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांना त्याचा फायदा मिळवून दिला. त्यातून घराघरांशी त्यांनी जोडलेले नाते त्यांना उपयोगी ठरत आले आहे. पहिल्या मंत्रिमंडळात विधी व न्याय खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी या सार्वजनिक रुग्णालयांचा फायदा नागरिकांना करून दिला. त्याचा फायदा त्यांना कायम होत आला आहे.
राज्यमंत्री, मंत्री आणि पालकमंत्री म्हणून काम करताना मतदारांशी थेट संपर्क हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ना चिठ्ठी ना पीए मतदार नागरिकांशी थेट संपर्क यामुळे त्यांना कायमच फायदा होत आला आहे, तसा आताही तो झाला. त्यांच्या विजयाने अजित पवार राष्ट्रवादीची लाज राखली गेली. या पक्षाला जिल्ह्यात केवळ एकमेव जागा मिळाली आहे. मुश्रीफ यांच्या विजयाने जिल्ह्यात महायुती भक्कम झाली आहे.
मुश्रीफ यांना मध्यंतरी ईडीचा त्रास झाला. यातून ते कसे उभारणार याची चर्चा असतानाच राष्ट्रवादीत फूट पडली व अजित पवार यांच्या नेतृत्वा बरोबर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला, त्याला मतदारांनी साथ दिली. महाविकास सोडून ते महायुतीबरोबर गेले, तर भाजपचे म्हणजेच महायुतीचे नेते असलेले समरजित घाटगे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत म्हणजे महाविकास आघाडीत दाखल झाले. स्वत: शरद पवार हे समरजित यांच्या पक्षप्रवेशासाठी कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात आले होेते. याच चौकात त्यांनी 1999 पासून मुश्रीफ यांच्या विजयासाठी सभा घेतल्या. पण, शरद पवार यांना कागलच्या गैबी चौकानेही या निवडणुकीत नाकारले. हसन मुश्रीफ म्हणजे राजकारणातले हिंदकेसरी, असे शरद पवार म्हणाले होते. आता हिंदकेसरीने वस्तादालाच आस्मान दाखविले आहे.