ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे तत्काळ मदत मिळणे शक्य, राधानगरीत ग्रामसुरक्षा यंत्रणा मेळाव्याचे आयोजन

5 hours ago 2

ग्रामसुरक्षा यंत्रणा वापरून नागरिक आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवू शकतात. आजपर्यंत नाशिक, सातारा, पुणे व नगर या जिह्यांत ही यंत्रणा यशस्वीरीत्या कार्यान्वित झाली असून, कित्येक संभाव्य दरोडे यामुळे टळले आहेत. अनेक जिह्यांत पूरस्थितीत अनेक नागरिकांना वेळेत मदत करणे प्रशासनास शक्य झाले आहे, अशी माहिती ग्रामसुरक्षा यंत्रणा राज्य संचालक दत्तात्रय गोर्डे-पाटील यांनी दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर एस. कार्तिकेयन यांच्या प्रयत्नांतून आणि राधानगरी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे ग्रामसुरक्षा यंत्रणा मेळाव्याचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी तहसीलदार अनिता देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेटे, पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांची विशेष उपस्थिती होती.

अनिता देशमुख म्हणाल्या, ‘‘हा लाभ घेण्यासाठी प्रत्येक लाभार्थी 50 रुपये याप्रमाणे प्रतिवर्ष शुल्क आकारण्यात येणार आहे. ग्रामनिधी/वित्त आयोग/लोकसहभाग या माध्यमातून हे शुल्क भरून तीन महिन्यांच्या आत जिह्यांतील सर्व गावांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करा. पहिल्या टप्प्यात छोटी व निधीची अडचण नसणारी गावे तातडीने पूर्ण करा. दुसऱया टप्प्यात मोठी व निधीची अडचण असणारी गावे निधीची तरतूद करून पूर्ण करा. गटविकास अधिकाऱयांसह तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने सुयोग्य नियोजन करून यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत गावोगावी भेटी द्या. जनजागृती करा, अशा सूचना देशमुख त्यांनी केल्या.

यावेळी ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे, जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे, अंमलदार दिगंबर बसरकर, राधानगरी पोलीस स्टेशनचे अंमलदार व हद्दीतील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, तलाठी, मंडलाधिकारी, तहसील कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी, पोलीसपाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्यसेविका, आरोग्य अधिकारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी आभार मानले.

ग्रामसुरक्षा यंत्रणेची वैशिष्टय़े

संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा, गावासाठी यंत्रणा सुरू करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत. संपूर्ण देशासाठी एकच टोल फ्री नंबर 18002703600. यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्तीकाळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो. संदेश देणाऱया व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात परिसरातील नागरिकांना मिळतो. दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता, ठिकाण कळल्याने गावकऱयांना विनाविलंब व नियोजनबद्ध मदत करता येते. नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलितरीत्या प्रसारित होतात. एका गावात चोरी करून चोर दुसऱया गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य. वाहनचोरीचा संदेश आजूबाजूच्या 10 कि.मी. परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ समजतो.

ग्रामसुरक्षा यंत्रणेचे फायदे

घटनाग्रस्त   नागरिकांना   परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळते. गावातील कार्यक्रम / घटना विनाविलंब ग्रामस्थांना एकाच वेळी कळतात. अफवांना आळा घालणे शक्य होते. प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येतो. पोलीस यंत्रणेस कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याकामी नागरिकांचे सहकार्य मिळते.

या घटनांसाठी वापर

चोरी,  दरोडय़ाची घटना, गंभीर अपघात, निधन वार्ता, आग जळिताची घटना, विषारी सर्पदंश, विषारी साप घरात घुसणे, पिसाळलेला कुत्रा गावात येणे, बिबटय़ाचा हल्ला, लहान मूल हरविणे, महिलांची छेडछाड, वाहनचोरी, शेतमालाची चोरी, रेशन, रॉकेल यांचे गावात सुरू झालेले वितरण, ग्रामसभा, ग्रामपंचायतच्या योजना सार्वजनिक कार्यक्रम यांची माहिती, गावातील शाळांकडून दिल्या जाणाऱया सूचना, सरकारी कार्यालयांकडून दिल्या जाणाऱया सूचना, पोलीस यंत्रणेकडून देण्यात येणाऱया सूचना आदी.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article