मराठी आता अभिजात भाषा! शिवसेनेच्या लढय़ाला यश… ऐतिहासिक घटना

5 hours ago 2

माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजा जिंके।…’ ज्ञानेश्वर माऊलींनी असा गौरव केलेली मराठी भाषा अभिजात भाषा झाली आहे. केंद्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून शिवसेनेच्या अनेक वर्षांच्या लढय़ाला यश मिळाले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला आज मंजुरी दिली. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा ग्रंथांचा संदर्भ मराठीला अभिजात भाषेचा बहुमान मिळण्यासाठी महत्त्वाचा ठरला.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली. इतकी वर्षे रखडलेला हा निर्णय आताच कसा घेतला, असे पत्रकारांनी विचारले असता ते गोंधळले. आमच्याकडे आतापर्यंत ज्या अधिसूचित अभिजात भाषा होत्या त्यात कन्नड, तेलुगु, मल्याळम या भाषांचा समावेश होता. नव्या भाषांसाठी प्रस्ताव आला. चौकटीत त्या बसल्या आणि म्हणून त्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे, असे उत्तर वैष्णव यांनी दिले.

भारतात 11 अभिजात भाषा

देशात 2004 मध्ये तामिळला सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. तामिळनंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू, 2013 मध्ये मल्याळम, 2014 मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आतापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता. आता मराठीसह आणखी पाच भाषांना हा बहुमान मिळाला आहे.

दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार

अभिजात भाषा म्हणून घटनेच्या परिशिष्टात नोंद झाल्यावर, अभिजात भाषेतील ज्ञानवंतांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते. प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्रही स्थापन केले जाते.z

जबाबदारी वाढली

खरं तर देरसे आये दुरुस्त आए… असंच म्हणावं लागेल. आता आपली जबाबदारी वाढली आहे.  राजकीय नेतेमंडळींवर जास्त जबाबदारी आहे. भाषिक अस्मिता सगळ्यात महत्त्वाची. आपली ओळख टिकवण्यासाठी आधी भाषिक अस्मिता टिकवली पाहिजे.

z डॉ. सदानंद मोरे, संत साहित्य अभ्यासक

मराठी रोजगाराची भाषा होईल

आधुनिक काळात तरुणाई इंग्रजी माध्यमाच्या मागे आहे. मराठी भाषा ज्ञानभाषा, रोजगाराची भाषा व्हायला पाहिजे. त्यादृष्टीने भाषा सल्लागार समितीने काही शिफारस केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होईल.

z लक्ष्मीकांत देशमुख, माजी  संमेलनाध्यक्ष

उशिरा का होईना

उशिरा का होईना…  प्रस्तावाचे  ‘अपॅडमिक  ईव्हॅलूशन’  लगेच झाले. प्रस्ताव मान्य व्हायला दहा वर्षे लागली. त्यामुळे आनंदावर विरजण पडल्यासारखे आहे. तसं ठीक आहे. आनंद आहे. झाला हा निर्णय  महत्त्वाचा आहे.

z रंगनाथ पठारे, ज्येष्ठ साहित्यिक

निर्णय सकारात्मक

मराठी नाटक आणि साहित्य क्षेत्रात भाषेच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. या निर्णयाचा त्याला समांतर पातळीवर पाठिंबा मिळेल.  लिखाण संपत चाललेय, असे वाटतेय. अशा पातळीवर  हा निर्णय पुढच्या पिढय़ांसाठी  सकारात्मक आहे.

z चंद्रकांत कुलकर्णी, लेखक-दिग्दर्शक

काय होणार फायदा

n मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह होईल.

n हिंदुस्थानातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल.

n मराठीतील प्राचीन ग्रंथ अनुवादित करता येतील.

n महाराष्ट्रातील सर्व 12000 ग्रंथालये सशक्त होतील.

n मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱया संस्था, व्यक्ती, विद्यार्थी आदींना सरकारकडून भरीव मदत मिळेल.

शिवसेनेने उभारली लोकचळवळ; राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे उठवला आवाज

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवसेनेने सदैव प्रयत्न आणि अथक पाठपुरावा केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, त्यात केंद्र सरकारने विलंब करू नये अशी ठोस भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे मांडण्यात आली. शिवसेनेच्या खासदारांनी संसदेतही सातत्याने यासाठी आवाज उठवला. गेल्या अनेक दशकांच्या या लढय़ाला यश आले असून मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा हा मोठा विजय आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात शिवसेना नेते सुभाष देसाई मराठी भाषा मंत्री होते. त्यांनी सातत्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळव्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला. आज त्याबाबत निर्णय झाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवसेना कित्येक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. विविध पातळ्यांवर लढा देत आहे. इतक्या वर्षांपासूनची अत्यंत न्याय्य मागणी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून का होईना मान्य झाली याचा मराठी माणसाला आनंद आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिजात मराठीचा मुद्दा अगदी पंतप्रधानांच्या बैठकीतही मांडला होता. त्यानंतर राष्ट्रपतींना पत्र पाठवण्याची मोहीम राबवली होती. ती एक लोकचळवळ बनली होती. मराठी भाषा मंत्री या नात्याने सांस्पृतिक मंत्रालय, गृहमंत्री यांच्या सातत्याने भेटी घेऊन मी या प्रश्नी पाठपुरावा केला होता, असे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितले.

आता सावरकरांना ‘भारतरत्न’ द्या

मराठी भाषा मागत होती तो न्याय आज मराठीला मिळाला. मराठी माणसाला त्याबद्दल जो आनंद आहे त्यात आम्ही सहभागी आहोत. महाराष्ट्राच्या अशाच दुसऱया मागण्याही आहेत. त्यासुद्धा केंद्राने मान्य कराव्यात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणीही केंद्र सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी, असे सुभाष देसाई म्हणाले.

महाराष्ट्रातील जनतेने चपराक लगावल्याने निर्णय – दिवाकर रावते

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला सणसणीत चपराक लगावून त्यांना महाराष्ट्रातील जनतेने जागा दाखवून दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीपोटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयाबद्दल जागरुक मराठी मतदारांचे मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि मराठी भाषेसाठी झटणारे माजी मंत्री दिवाकर रावते यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

अखेर केंद्र सरकार झुकलं!

गेल्या कित्येक वर्षांचा मराठी भाषिकांचा लढा, मागल्या अनेक सरकारांचा केंद्रासोबतचा पत्र व्यवहार, महाविकास आघाडी सरकारच्या काळात केलेलं दस्तावेजीकरण आणि तमाम मराठी मनांच्या तीव्र इच्छाशक्तीपुढे अखेर केंद्र सरकार झुकलं आणि निवडणुकांच्या तोंडावर का होईना आपल्या मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळाला! त्यासाठी जगभर पसरलेल्या मराठी भाषिकांचे मनःपूर्वक अभिनंदन, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. आता महाराष्ट्राचे पळवलेले उद्योगही परत आणा, मराठी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवा आणि मराठी माणसाच्या हक्काची ‘गिफ्ट सिटी’ मुंबईला परत द्या, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article