हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला पाठीचा कणा दिला आहे. मात्र हा बळकट कणा दोन गुजराती व्यापारी खेचून नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुंबई अदानीला तर नवी मुंबई अंबानीला आंदण दिली आहे. जे काही चांगले दिसेल त्या ठिकाणी यांच्या पाट्या लागत आहेत. मराठी माणसाला उपरा बनवण्याचा घाट घातला जात असून त्याला गद्दार साथ देत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक ही फक्त निवडणूक नाही तर मुंबई आणि महाराष्ट्र वाचवण्याची लढाई आहे. गद्दारांनी महाराष्ट्र देशोधडीला लावण्याचा कितीही घाट घातला तरी महाराष्ट्र वाचवण्यासाठी जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहणार आहे, असा विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज कोपरखैरणे येथे व्यक्त केला.
ऐरोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव मशाल देरणार बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे उमेदवार एम. के. मढवी यांची प्रचार सभा कोपरखैरणे येथील माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील मैदानात आयोजित करण्यात आली होती. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी शिवसेना फोडली. मुंबई गिळण्यासाठी मराठी माणसांना कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करता येणार नाही, असे खासदार संजय राऊत यांनी खोके सरकारला फटकारले. याप्रसंगी काँग्रेसचे नेते भाई जगताप, ऐरोलीतील महाविकास आघाडीचे उमेदवार एम. के. मढवी, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, नासीर हुसेन, अंकुश सोनावणे, गुरुज्योतसिंग सप्रा, लीलाताई लिमये, विद्याधर चव्हाण, प्रकाश पाटील, सूर्यकांत मढवी, अतुल कुळकर्णी, प्रवीण म्हात्रे, अनिस गाढवे आदी उपस्थित होते.
न्हावाशेवा बंदर गुजरातला पळवण्याचा भाजपचा घाट
उरण – महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पळवून इथल्या तरुणांचे रोजगार हिरावून घेणाऱ्या खोके सरकारने आता न्हावाशेवा जेएनपीए बंदर बंद करून तेही गुजरातला हलवण्याचा घाट घातला आहे. प्रकल्पग्रस्तांची कामे हिसकावून घेतली जात आहेत. तिसऱ्या मुंबईचे भूत उभे करून उरणपासून ते अलिबागपर्यंतच्या 124 गावांतील भूमिपुत्रांना सुखाने जगू न देण्याचा सरकारने विडा उचलला आहे असा घणाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उरण आणि रसायनी येथे केला. उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या प्रचार सभेत खासदार संजय राऊत यांनी खोके सरकारच्या महाराष्ट्रद्वेष्ट्या कारभाराचा पंचनामा केला.