Published on
:
18 Nov 2024, 7:37 am
Updated on
:
18 Nov 2024, 7:37 am
गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 34 लाख 83 हजार 401 मतदार होते. यंदाच्या 2024 च्या विधानसभेसाठी 37 लाख 83 हजार 987 मतदारसंख्या आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल 3 लाख 586 मतदार वाढले आहेत. यामध्ये सर्वांधिक वाढ शेवगाव मतदारसंघात 32 हजार 569 तर सर्वात कमी वाढ 12 हजार 761 अकोले मतदारसंघात झाली आहे.
जिल्ह्यात विधानसभेसाठी 12 मतदारसंघ आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंख्या 34 लाख 83 हजार 401 इतकी होती. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने दरवर्षी बिनचूक मतदारयादी करण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या आसपास मतदार नोंदणी कार्यक्रम राबविला जातो. यामध्ये नवीन मतदान नोंदणी, मयत, दुबार वगळणी आणि स्थलांरित आदी कार्यक्रमाचा समावेश आहे. त्यानंतर 5 जानेवारीला जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जात आहे. याशिवाय दरवर्षी निरंतर मतदार नोंदणी देखील सुरु असते.
2024 मध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यानंतर पुन्हा 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना तसेच मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांना मतदारनोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 23 हजारांवर मतदारांची नोंदणी झालेली आहे. त्यानंतर जिल्हा निवडणूक विभागाने विधानसभेसाठी 37 लाख 83 हजार 987 मतदारसंख्या असलेली अंतिम मतदारयादी 30 ऑक्टोबरमध्ये प्रसिध्द केली आहे. यामध्ये 19 लाख46 हजार 944 पुरुष तर 18 लाख 36 हजार 841 महिला मतदारांचा समावेश आहे.
अकोले : 12761, संगमनेर : 18675, शिर्डी : 29854, कोपरगाव :24472, श्रीरामपूर : 21451, नेवासा : 19953, शेवगाव : 32569, राहुरी : 31396, पारनेर : 28296, अहमदनगर शहर : 27165, श्रीगोंदा : 27534, कर्जत -जामखेड : 26460.