काँग्रेसकडून भाषा अन् जातीच्या आधारावर देशाचे विभाजन; योगी आदित्यनाथ यांचा घणाघातPudhari File Photo
Published on
:
18 Nov 2024, 9:19 am
Updated on
:
18 Nov 2024, 9:19 am
Pimpri Yogi Adityanath Sabha: काँग्रेसच्या नेतृत्वाने 1947 मध्ये देशाची फाळणी केली. आता स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसकडून भाषा आणि जातीच्या आधारावर देशाचे विभाजन केले जात आहे, असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी (दि. 17) केला.
भोसरी मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ गावजत्रा मैदानावर आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील महायुतीचे ध्येय हे एक भारत-श्रेष्ठ भारत आहे. तर, महाविकास आघाडी ही महाअनाडी आहे. त्यांच्याकडे नीती, नैतिक बळ आणि निर्णय घेण्याचे सामर्थ्य नाही. सबका साथ लेकीन, परिवार का विका,स हीच त्यांची घोषणा आहे, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.
बटेंगे नही तो कटेंगे भी नही, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, या घोषणांचा पुनरुच्चार करत योगी म्हणाले, काँग्रेस हे सत्तालोलुप आहे. त्यांनी देशाचे हीत पाहिले नाही. 1947 मध्ये झालेल्या फाळणीत लाखो हिंदूंची हत्या झाली. ही फाळणी झाली नसती तर आज अखंडभारत दिसला असता. आमच्यातच एकतेचा अभाव आहे. त्यामुळेच विशाळगडावर अतिक्रमण होते. गणेशोत्सव आणि रामनवमीच्या मिरवणुकीत दगडफेक होते, असेही त्यांनी नमूद केले
...तर भारत एकसंघ राहिला असता
काँग्रेसने सत्तेची लालसा ठेवली नसती, तर 1947 मध्ये अखंड भारत देशाचे विभाजन झाले नसते. भारत एकसंघ राहिला असता, लाखो निर्दोष हिंदू लोकांची कत्तल झाली नसती. ‘हिंदू-मुस्लिम’ अशी समस्या निर्माण झाली नसती. हिंदू-मुस्लिम समस्या भारताच्या विभाजनामुळे सुरू झाली. अखंड भारतात अशी समस्या निर्माण जरी झाली असती, तरी आज आम्ही समस्येचा निपटारा करीत आहोत, तसाच हिंदु-मुस्लिम समस्येचा निपटारा केला असता.
मात्र, काँग्रेसच्या सत्तालोलूपता आणि तुष्टिकरणाच्या भूमिकेमुळे देशाचे विभाजन झाले. स्वातंत्र्यानंतर जात-प्रांत अशा मुद्यांवर देशाचे विभाजन करण्यात आले, असा दावाही योगी आदित्यनाथ यांनी केला. अयोध्येत 500 वर्षानंतर श्रीराम मंदिर उभे राहिले. त्याबाबत भाजपाने 2 वर्षात समाधान शोधले. काँग्रेस ही समस्या आहे. तर, भाजपा हे समाधान आहे, असे मतही योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले.
काँग्रेस आघाडी समस्या, तर भाजप महायुती समाधान!
भारताचा पाया सनातन आहे आणि सनातनवर प्रहार हा महाविनाशाला आमंत्रण आहे. बटेंगे तब कटेंगे.. अब बटेंगे नहीं, एक रहेंगे तो सेफ रहेंगे... काँग्रेस सत्ताकाळात पाकिस्तान भारतात घुसखोरी आणि दहशतवादी हल्ले करीत होता. आम्ही संसदेत आवाज उठवत होतो. त्या वेळी पाकिस्तानशी संबंध बिघडतील म्हणून काँग्रेस या मुद्द्यावर बोलू नका, अशी भूमिका घेत होते.
मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात नवा भारत म्हणजे हम छेडेंगे नहीं लेकीन हमें छेडेंगे, तो छोडेंगे नहीं असा संदेश जगभरात गेला आहे. घुसखोरी कराल, तर घुसून मारण्याची हिंमत ठेवतो, असे स्पष्ट करतानाच देशाच्या समस्येचे कारण काँग्रेस आघाडी आहे, तर समस्यांवरील समाधान भाजप महायुती आहे, असा घणाघात योगी आदित्यनाथ यांनी केला.